News Flash

हैदराबादी बिर्याणीने मिळवून दिला हक्काचा रोजगार, परप्रांतीय मजुरांसाठी धावून आलं बिहार प्रशासन

जिल्हा प्रशासनाने मिळवून दिला हक्काचा रोजगार

तुम्ही एखाद्या कामात पारंगत असाल तर जगाच्या पाठीवर कोणत्याही कठीण परिस्थितीत तुमचा निभाव लागू शकतो. करोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात लॉकडाउनमध्ये अनेक परप्रांतीय मजुरांना आपला रोजगार गमवावा लागला. यामध्ये हॉटेलमध्ये अन्नपदार्थ तयार करणाऱ्या लोकांनाही याचा फटका बसला. अजुनही देशात बऱ्यात भागांमध्ये हॉटेल व्यवसाय पूर्णपणे सुरु झालेला नाही. अशातच हैदराबादी चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, चिकन ६५, चिली चिकन असे एकाहून एक लज्जतदार पदार्थ बनवणाऱ्या हैदराबादी हॉटेल कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. बिहारमध्ये विविध हॉटेलमध्ये काम करणारे तेलंगणातले मजूर लॉकडाउन काळात आपल्या घरी परतले. परंतू रोजगाराची सोय होत नसल्यामुळे कामाच्या शोधासाठी त्यांनी पुन्हा एकदा बिहार गाठायचं ठरवलं. यादरम्यान बांका जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी या मजुरांच्या हातच्या अस्सल हैदराबादी जेवणाचा आस्वाद घेतला, सर्व बडे अधिकारी जेवणाच्या प्रेमात पडले आणि या मजुरांचं नशीबच पालटलं.

सरकारी अधिकाऱ्यांनी हे मजुर बिहारमधील ज्या हॉटेलमध्ये काम करत होते, त्याची माहिती घेतली. हैदराबादी बिर्याणीपासून कबाबपर्यंत सर्व पदार्थ हे मजुर अत्यंत चांगल्या पद्धतीने बनवत असल्याचं यावेळी समोर आलं. जिल्हा दंडाधिकाऱ्यांपासून पोलीस अधिक्षकांपर्यंत सर्व मोठ्या अधिकाऱ्यांनी या मजुरांच्या हातच्या जेवणाची चव चाखली. यानंतर या कामगारांना बिहारमध्येच हक्काचा रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न अधिकाऱ्यांनी सुरु केले. अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर, १० ते १५ कामगारांचा एक बचतगट तयार करुन त्यांना सरकारी कामाचं प्रशिक्षण देण्यात आलं. केटरिंग, हाऊसकिपींग या कामांची माहिती देत, बिहारमधील आगामी निवडणूक काळात सरकारी अधिकाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचं काम या मजुरांना मिळेल अशी व्यवस्था बांका जिल्हा प्रशासनाने केली आहे. बांका जिल्हा प्रशासनाने आपल्या अखत्यारित असलेल्या ४ सर्कीट हाऊससाठी कंत्राट काढलं आहे, ज्यात या मजुरांना वर्षाला १ कोटी रुपये मिळणार आहेत.

“तेलंगणामधून बिहारमध्ये परतलेले काही मजुर हे खरंच चांगले आचारी आहेत. त्यांच्या जेवणाचा चव आहे, याव्यतिरीक्त काही मजुर हे वेटर, हाऊसकिपींग आणि अन्य काम करतात. अशा मजुरांची जिल्हा प्रशासन मदत करत आहे. आगामी निवडणूक काळात कामांमध्ये या मजुरांना रोजगार मिळेल अशी व्यवस्था आम्ही केली आहे. निवडणुक काळात जेवणापासून इतर गोष्टींची जबाबदारी या कामगारांवर असेल ज्यातून त्यांना चांगला आर्थिक मोबदलाही मिळेल.” बांका जिल्हाधिकारी सुहर्षा भगत यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना माहिती दिली. सध्याच्या खडतर काळातही आपल्याला काम मिळत असल्यामुळे हे कामगारही आनंदी आहेत. “हैदराबादमध्ये असताना मी चायनीज पदार्थांपासून सर्व गोष्टी बनवायचो. मला महिन्याला २७ हजार ५०० रुपये पगार मिळायचा. पण करोनामुळे लॉकडाउन काळात हॉटेल व्यवसाय बंद पडल्यामुळे माझा रोजगार तुटला. माझी शेती नाहीये, चांगलं जेवणं बनवणं हीच माझी कला आहे. त्यामुळे माझ्या आवडीच्या कामासाठी सरकार मला मदत करतंय याचा मला आनंद आहे. सध्या आम्ही दिवसाला १०० पेक्षा जास्त लोकांसाठी जेवण बनवतोय.” धर्मेंद्र कुमार राय या कामगाराने आपली प्रतिक्रीया दिली.

तेलंगणावरुन बिहारमध्ये परतलेल्या अनेक कामगारांनी आता हळुहळु आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. हैदराबादी बिर्याणी बनवण्यात माहीर असलेला रणजीत कुमार यादव हा आता स्थानिक लग्नकार्यात जेवण बनवण्याची काम करतोय. काम नसल्यामुळे पुन्हा गावाला जावं लागणार नाही अशी या मजुरांना आशा आहे. सरकारी कामासोबत इतर छोट्या-मोठ्या कामांमधून या मजुरांना आता पैसे मिळत आहेत. त्यामुळे बिहारमधील बांका जिल्हा प्रशासनाने या मजुरांना रोजगार मिळवून देण्यासाठी उचललेल्या पावलांचं खरंच कौतुक करायला हवं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 10:55 am

Web Title: covid 19 fighters biryani in banka migrants bring taste of hyderabad home psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनासंदर्भात WHO चा­ चीनवर मोठा आरोप
2 अरे बापरे… देशात करोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
3 युद्धसराव थांबवा, अन्यथा…; फिलिपिन्सचा चीनला इशारा
Just Now!
X