News Flash

२२ देशांमध्ये करोनाची तिसरी लाट; जागतिक रुग्णसंख्येने ओलांडला १३ कोटी ३० लाखांचा टप्पा

२८ लाख ८६ हजार जणांचा मृत्यू

(मूळ फोटो रॉयटर्सवरुन साभार)

भारतामध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे. एका दिवसात भारतामध्ये सव्वा लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. एकीकडे भारतामध्ये करोना रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे जगभरातील २२ देशामध्ये करोनाची तिसरी लाट आलीय. यामध्ये प्रामुख्याने ब्राझील, फ्रान्स, युक्रेन आणि रशियासारख्या देशांचा समावेश आहे. जगभरामध्ये सोमवारपर्यंत करोनाचे १३ कोटी ३० लाखांहून अधिक रुग्ण आढळून आल्याचं आयएएनएसने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. यापैकी २८ लाख ८६ हजार जणांचा मृत्यू झालाय. तर १० कोटी ७२ लाख जणांनी करोनावर मात केलीय. जगभरामध्ये दोन कोटी २८ लाख लोकांवर उपचार सुरु आहे. उपचार सुरु असणाऱ्यांपैकी २ कोटी २७ लाख जणांना करोनाची कमी अधिक प्रमाणात लक्षणं दिसून येत आहेत तर ९९ हजार ५०० हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

सध्या जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव अंत्यंत वेगाने होत असून यासंदर्भात चिंता व्यक्त केली जातेय. धक्कादायक बाब म्हणजे जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतरही अगदी वेगाने करोनाचा प्रादुर्भाव होऊ लागलाय. जगभरामध्ये करोनाची दुसरी लाट सर्वाधिक घातक ठरली आहे. या दुसऱ्या लाटेमध्येच करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलीय आणि सर्वाधिक मृत्यू सुद्धा याच कालावधीमध्ये झालेत. २१ फेब्रुवारी रोजी जगामध्ये सर्वात कमी म्हणजे तीन लाख २२ हजार रुग्ण आढळून आले होते. यानंतर मात्र सातत्याने करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. या कालावधीत करोना लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असला तरी सध्या दिवसाला पाच लाखांहून अधिक करोनाबाधित रुग्ण जगभरामध्ये आढळून येत आहेत.

अमेरिकेत एका दिवसात तीन लाख ८० हजार रुग्ण

अमेरिकेतील करोनाबाधितांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असं दिसून येतं की पहिल्या लाटेमध्ये येथे ८० हजारांहून अधिक रुग्ण एका दिवसात आढळून येत होते. दुसऱ्या लाटेमध्ये या संख्येत एक हजार पटींनी वाढ झाल्याचं दिसून आलं. दुसऱ्या लाटेत एका दिवशी अमेरिकेत तब्बल तीन लाख ८० हजार रुग्णही आढळून आलेत. याचप्रमाणे ब्राझीलमध्ये पहिल्या लाटेत दिवसाला ७० हजार करोना रुग्ण आढळून यायचे ती संख्या ९७ हजारांहून अधिक झाल्याचे दुसऱ्या लाटेत पहायला मिळालं. आता येथे करोनाची तिसरी लाट आली आहे.

जपानमध्ये चौथ्या लाटेची भीती

जपानमध्ये १०७ दिवसांनंतर ऑलम्पिक सुरु होणार आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी जपानमध्ये अडीच हजार नवे रुग्ण आढळून आल्याने देशात चौथी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. जपानचे आरोग्य मंत्री नोरीहिसा तामुरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटीश व्हेरिएंटमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढलाय. जपानमध्ये सोमवारी दोन हजार ४५८ नवे रुग्ण आढळून आले तर १० जणांचा मृत्यू झाला. शनिवारी नव्याने संसर्ग झालेल्यांचा आकडा दोन हजार ७०२ इतका होता. शनिवारी आठ जणांचा मृत्यू झाला होता.

युरोपमध्ये ११ लाख मृत्यू

युरोपमधील ५१ देशांमध्ये आतापर्यंत ११ लाख जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. युनायटेड किंग्डम, रशिया, फ्रान्स, इटली आणि जर्मनीसहीत पाच युरोपीयन देशांमध्ये एकूण करोना मृत्यूंपैकी ६० टक्के मृत्यूंची नोंद झालीय. तर अमेरिकेमध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या पाच लाख ५५ हजार इतकी आहे. कोणत्याही देशात करोनामुळे झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. मागील तीन आठवड्यांमध्ये अमेरिकेतील मृत्यूंचे प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.

३७ कोटी लोकांना करोनाची लस

अवर वर्ल्ड इन डेटाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार रविवारपर्यंत किमान ३७ कोटी ३० लाख जणांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय. जागतिक आरोग्य संघटनेने जगातील गरीब देशांना लस पुरवठा करण्यासाठी मोठ्या देशांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 10:56 am

Web Title: covid 19 global caseload now over 13 crore scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 देशात करोनाचा कहर, २४ तासांत सव्वा लाखांहून अधिक रुग्णांची नोंद; महाराष्ट्रात ‘महा’संकट
2 Coronavirus : भारतातून येणाऱ्यांना न्यूझीलंडमध्ये No Entry; स्वत:च्या नागरिकांनाही प्रवेश नाकारला
3 …म्हणून करोना असला तरी महाकुंभ भव्यदिव्य पद्धतीनेच झाला पाहिजे; रावत यांचं वक्तव्य
Just Now!
X