करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असून अनेक राज्यांनी लॉकडाउन जाहीर केलं आहे. काही राज्यांमध्ये जिल्हास्तरावर लॉकडाउनचा निर्णय घेतला जात असून नागरिकांवर निर्बंध आणले जात आहे. दुसरीकडे देशातही लॉकडाउन लावला जावा अशी मागणी काही राजकीय नेत्यांकडून केली जात आहे. दरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख बलराम भार्गव यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये फैलाव रोखण्यासाठी किमान पुढील सहा ते आठ आठवडे लॉकडाउन ठेवला पाहिजे असं मत बलराम भार्गव यांनी व्यक्त केलं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये चाचणीमध्ये संसर्ग दर १० टक्क्यांच्या पुढे आहे तिथे लॉकडाउन लावण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

‘टाळेबंदी ३१ मेपर्यंत’, दोन दिवसांत नवीन मार्गदर्शक तत्त्वे

सध्या भारतातील ७१८ जिल्ह्यांपैकी भारताच्या तीन चतुर्थांश भागात टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या पुढे आहे. यामध्ये नवी दिल्ली, मुंबई तसंच बंगळुरुचा समावेश आहे. बलराम भार्गव यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने करोनाला रोखण्यासाठी आधीच अनेक ठिकाणी लागू करण्यात आलेला लॉकडाउन किती काळ असला पाहिजे यावर भाष्य केलं आहे.

दरम्यान एकीकडे दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असल्याने देशात लॉकडाउन जाहीर केला जावा अशी मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र त्यासाठी इच्छुक नाही. अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता केंद्राने लॉकडाउनचा निर्णय राज्यांवर सोपवला आहे. यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेश, केरळ, नवी दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.

“पॉझिटिव्ह रुग्णसंख्या जास्त असणाऱ्यांना जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन लावला पाहिजे. पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांहून पाच टक्क्यांवर आल्यानंतर सर्व काही सुरळीत करु शकतो. पण तसं झालं पाहिजे, आणि हे सहा ते आठ आठवड्यांमध्ये होणार नाही हे नक्की,” असं बलराम भार्गव यांनी सांगितलं आहे.

बलराम भार्गव यांनी यावेळी मोदी सरकारवर टीका केली नाही, मात्र करोना संकटाला उत्तर देण्यास उशीर झाल्याचं मान्य केलं. “मला वाटतं १० टक्क्यांची शिफारस मान्य कऱण्यास उशीर झाला. १५ एप्रिलला टास्क फोर्सने सरकारला १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असणाऱ्या ठिकाणी लॉकडाउन करण्याची शिफारस केली होती,” अशी माहिती त्यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 icmr chief balram bhargava says most of country should remain locked down for 6 to 8 weeks sgy
First published on: 13-05-2021 at 09:28 IST