ब्रिटनमध्ये करोना उपचारांबाबत संशोधन

नवी दिल्ली : शरीराचे वजन जास्त असल्याने कोविडचे परिणाम आणखी गंभीर बनतात. त्यामुळे अतिदक्षता विभागात दाखल करण्याची वेळ येण्याची शक्यता वाढते, असे दी लॅन्सेट डायबेटिस अँड एंडोक्रायनोलॉजी या नियतकालिकात म्हटले आहे.

ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार वजन  जास्त असल्याने करोनाचे घातक परिणाम दिसतात. बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स ज्यांचा जास्त असेल त्यांच्यात कोविडची गुंतागुंत होण्याचे प्रकार वाढतात असे दिसून आले आहे. बीएमआय हा शरीरातील एकूण वजनाला उंचीने भागल्यानंतर येणारा आकडा असतो.

या संशोधनात उंची मीटरमध्ये मोजण्यात आली होती. एकूण ६९ लाख लोकांच्या अभ्यासात ब्रिटनमध्ये असे दिसून आले, की यातील वीस हजार रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते किंवा त्यांच्यापैकी काहींचा मृत्यू झाला होता. संशोधकांच्या मते हे सगळे ब्रिटनमधील पहिल्या लाटेत घडले होते.

संशोधकांना असे दिसून आले, की ज्यांचा बीएमआय चौरस मीटरला २३ किलो होता त्यांच्यातही कोविडचे परिणाम जास्त दिसून आले. एरवी २३ हा बीएमआय फारसा घातक मानला जात नाही. बीएमआय वाढलेल्या रुग्णात अतिदक्षता रुग्णालयात दाखल करण्याची  शक्यता १० टक्कय़ांनी वाढली, त्यांची जोखीमही वाढली. जे लोक कमी वजनाचे होते म्हणजे ज्यांचे वजन- उंची गुणोत्तर  १८.५ पेक्षा कमी होते त्यांच्यातही कोविडचे दुष्परिणाम जास्त दिसून आले. २० ते ३९ वर्षे वयाच्या तरुण व्यक्तींमध्ये जोखीम अधिक दिसून आली, तर साठीनंतरच्या व्यक्तींमध्ये जोखीम कमी दिसून आली. ८० वर्षांच्या व्यक्तींमध्ये वजन- उंची गुणोत्तराचा म्हणजे बीएमआयचा फारसा परिणाम कोविड १९ जोखमीवर दिसून आला नाही. २०-३९ वयोगटातील व्यक्तींमध्ये हे प्रमाण जास्त होते तर इतर वयोगटात तुलनेने कमी होते.

लसीकरणात प्राधान्य देण्याची गरज

संशोधनाचे लेखक कॅरमन पियरनास यांनी सांगितले, की जास्त वजन असणे हे कोविडची गुंतागुंत वाढवणारे ठरते. त्यामुळे वजन- उंची गुणोत्तराचा यात संबंध आहे. ४० वर्षांखालील जास्त वजनाच्या व्यक्तींमध्ये जोखीम जास्त दिसून आली, तर ८० वयानंतर वजनाचा कोविड गंभीरतेकडे झुकण्याच्या जोखमीशी कमी संबंध होता. याचा अर्थ लसीकरण करताना जास्त वजनाच्या व्यक्तींचे लसीकरण वेगाने केले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.