कर्नाटकमध्ये मंगळवारी सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच कर्नाटकने दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृतांच्या यादीत महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकावर ढकललं असून नकोसं पहिलं स्थान मिळवलं आहे. भारतात फेब्रुवारीच्या मध्यात करोनाची दुसरी लाट आल्यापासून पहिल्यांदाच कर्नाटकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.

कर्नाटकमध्ये सोमवारी २४ तासांत ३९ हजार ३०५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर एकूण ५९६ जणांचा मृत्यू झाला. एकीकडे देशातील एकूण रुग्णसंख्या दोन आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच साडे तीन लाखांपेक्षा कमी झाल्याची नोंद होत असताना कर्नाटकमध्ये मात्र चिंता वाढवणारी संख्या समोर आली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात सोमवारी ३७ हजार २३६ रुग्णांची तर ५४९ मृत्यूंची नोंद झाली.

आणखी वाचा- रुग्णवाढीला ब्रेक, पण मृत्यूचं संकट कायम! करोनाबळींची संख्या अडीच लाखांवर

कर्नाटकमध्ये सर्वाधिक मृत्यू बंगळुरुमध्ये नोंदवण्यात आले. बंगळुरुत ३७४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. याआधी बंगळुरुत ७ मे रोजी सर्वाधिक ३४६ मृत्यूंची नोंद झाली होती. सोमवारी दिल्लीत सर्वाधिक ४०० मृत्यूंची नोंद झाली असून बंगळुरु दुसऱ्या क्रमांकावर होतं. बंगळुरुमध्ये आतापर्यंत करोनामुळे ८४३१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा- करोनाची दुसरी लाट येईल असा इशारा वैज्ञानिकांनी दिल्यानंतरही मोदी सरकार झोपा काढत राहिलं : ओवेसी

कर्नाटकमध्ये एप्रिल महिन्यात १८५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. कर्नाटकने सोमवारी जाहीर केलेल्या संख्येत यांचाही समावेश केला होता. याआधी ७ मे रोजी कर्नाटकमध्ये सर्वाधिक ५९२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. एका दिवसात ५०० हून अधिक मृत्यू होणाऱ्यांच्या यादीत महाराष्ट्रानंतर कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावरील राज्य होतं.