देशातली करोनाची दुसरी लाट आता काहीशी ओसरताना दिसत आहे. दैनंदिन बाधितांची, मृतांची संख्या जरी कमी होत असली तर बेरोजगार होणाऱ्यांची संख्या मात्र सातत्याने वाढत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात येणाऱ्या लॉकडाउनमुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. तसंच बेरोजगारीच्या प्रमाणातही कमालीची वाढ झाली आहे.

एका खासगी संशोधन संस्थेने याबद्दलचा अभ्यास केला आहे. त्यांच्या या अभ्यासानुसार, या वर्षी मे महिन्यात भारतातल्या जवळपास दीड कोटींहून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यामुळे देशातल्या बेरोजगारीच्या प्रमाणात कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात देशातलं बेरोजगारीचं प्रमाण ७.९७ टक्के होतं. मात्र या वर्षीच्या मे महिन्यामध्ये हेच प्रमाण ११.९ टक्क्यांवर पोहोचलं आहे.

आणखी वाचा – आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करावी; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

गेल्या वर्षीच्या तुलनेत ही फार मोठी वाढ आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये हे प्रमाण १०.१८ टक्के होतं. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी(CMIE)यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोजगार असणाऱ्यांपैकी शहरी भागातले जवळपास १४.७३ टक्के तर ग्रामीण भागातले १०.६३ टक्के लोक बेरोजगार झाले आहेत.

गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनदरम्यान बेरोजगारीचा दर सर्वाधिक म्हणजे २३.५२ टक्के होता. मात्र पुढच्या महिन्यापासून हा दर कमी होऊ लागला. मे २०२० मध्ये देशातला बेरोजगारीचा दर २१.७३ टक्क्यांवर पोहोचला. CMIEने दिलेल्या माहितीनुसार, मे मध्ये ३७.५४५ कोटी लोकांकडे रोजगार आहे, तर एप्रिलमध्ये ३९.०७९ कोटी लोकांना रोजगार मिळाला होता. म्हणजेच मेमध्ये १.५३ कोटीहून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.