एकीकडे करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत असताना अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लावण्याचा पर्याय निवडला आहे. अनेक राज्यांनी लॉकडाउन जाहीर केला असून यामध्ये उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. मात्र उत्तर प्रदेशात लॉकडाउन असतानाही नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करत मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी करण्यात आल्याचा प्रकार समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुस्लिम धर्मगुरु अब्दुल हमीद मोहम्मद सालिमुल कादरी यांचं रविवारी निधन झालं. दरम्यान लॉकडाउन असतानाही त्यांच्या अंत्ययात्रेसाठी हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. बदायूँ येथील मशिदीत त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. यावेळी अत्यंदर्शनासाठी उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक लॉकडाउनचं उल्लंघन करत मशिदीत पोहोचले होते. मशिदीच्या बाहेर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. “बदायूँमध्ये मुस्लीम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेदरम्यान करोनाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल कलेा आहे. १८८ तसंच संबंधित इतर कलमांच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे,” अशी माहिती बदायूँचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने करोनावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाउन जाहीर केला असून अंत्यसंस्कारासाठी फक्त २० जणांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिली आहे.