दिल्लीत करोनाच्या चौथ्या लाटेचा उद्रेक झाला असून, अद्यापही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. दिल्लीतील आरोग्य व्यवस्थेची स्थिती बिकट असून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सलग तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे लॉकडाउनमुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या मिळकतीवर परिणाम झाल्यानं केजरीवाल सरकारने मदत करण्याची घोषणा केली आहे.

दिल्लीत कडक लॉकडाउन केलेला असून, सलग दोनदा लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठा फटका बसला आहे. करोनामुळे रिक्षा व टॅक्सीचालकांना आर्थिक समस्यांना सामोर जावं लागत असल्याची बाब लक्षात घेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी ५००० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. या मदतीमुळे आर्थिक संकटात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना थोडा दिलासा मिळेल, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- बिहारमध्ये १५ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा; न्यायालयाच्या अल्टीमेटम नंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय

“दिल्लीतील सर्व रेशन कार्डधारकांना, ज्यांची संख्या जवळपास ७२ लाख आहे. त्यांना पुढील दोन महिने मोफत रेशन देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. दोन महिने रेशन देणार याचा अर्थ दोन महिने लॉकडाउन असणार असा नाहीये. आर्थिक संकटातून जात असलेल्या गरिबांना मदत करण्याच्या दृष्टीने ही मदत केली जात आहे,” अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.