देशामध्ये करोना लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. एकीकडे देशामध्ये करोना लसीकरण सुरु असतानाच दुसरीकडे भारताने आपल्या शेजारी देशांनाही मदतीचा हात दिला आहे. भारताने आपल्या शेजारच्या दहा देशांना करोनाची लस मोफत देण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशेल्ससारख्या देशामध्ये करोना लसींचा पुरवठा केला जात आहे. तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरिशियससारख्या देशांसोबत भारताची चर्चा सुरु आहे. मात्र भारताने देऊ केलेल्या या मदतीमुळे चीनच्या पोटात मात्र दुखू लागलं आहे. चीनने सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीबद्दलच चुकीची माहिती पसरवण्यास सुरुवात केलीय.

चीनचं म्हणणं काय?

चीनचे सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्सने सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीला लागलेल्या आगीनंतर भारताच्या लस निर्मिती क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ग्लोबल टाइम्सने असा ही दिवा केला आहे की चीनमध्ये राहणारे भारतीय लोकं भारतीय लसीपेक्षा चिनी बनावटीच्या लसीला प्राधान्य देत आहेत. बीबीसीच्या वृत्ताच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्सने पेशंट्स राइट्स ग्रुप ऑल इंडिया ड्रग्स अ‍ॅक्शन नेटवर्कने सीरमच्या लसीसंदर्भातील ब्रीजिंग स्टडी अपूर्ण असल्याचा दावा केलाय.

नक्की वाचा >> भारतातील करोना लसीकरणात कंडोम बनवणारी कंपनी बजावणार महत्त्वाची भूमिका

चीनने लस पुरवठा करतानाही राजकारणाला दिलं प्राधान्य

समोर आलेल्या माहितीनुसार चीनने करोना लसीचा पुरवठा करतानाही राजकारणाला प्राधान्य दिल्याचं पहायला मिळत आहे. ज्या देशांमध्ये आपले राजकीय आणि आर्थिक हितसंबंध दृढ करण्याची चीनला गरज वाटत आहे अशा देशांसाठी चीनने विशेष सवलतीच्या दरामध्ये लस देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नेपाळ आणि मालदीवसारख्या भारताच्या शेजरी देशांचाही मसावेस आहे. नेपाळमधील औषध नियामक मंडळाने चिनी बनावटीच्या लसीला अद्याप परवानगी दिलेली नाही. तर मालदीव सरकारमधील सुत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार चिनी लसीसंदर्भात सरकारने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.

कशी आहे चिनी लस?

बीजिंगमधील औषध निर्मिती कंपनी असणाऱ्या साइनोवैकने करोनावैक नावाची लस तयार केली आहे. ही एक इनएक्टिवेटेड प्रकारची लस आहे. ही लस विषाणुंचा खात्मा करते ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती या विषाणुंच्याविरोधात सक्रीय होते. यामध्ये गंभीर आजार किंवा दुष्परिणाम होण्याची शक्यता नसते असा दावा केला जात आहे. पाश्चिमात्य देशांमधील मॉडर्ना आणि फाइजर लसींशी तुलना केल्यास चिनी लस ही एमआरएनएवर आधारित लस आहे. याचा अर्थ असा की विषाणूची रचना ज्या जेनेटिक कोड्सने झालेली असते ते कोड्स शरीरामध्ये या लसीच्या माध्यमातून टाकले जातात. यामुळ शरीरातील विषाणूंविरोधात लढणारे प्रोटीन्स सक्रिय होतात. या लसीच्या माध्यमातून केवळ रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमाणात एमआरएनए शरीरात सोडले जातात.

भारतीय लसीला जगभरातून मागणी

मागील आठवड्यामध्ये अनेक देशांनी भारतीय बनावटीची करोना लस विकत घेण्यामध्ये रस दाखवला आहे. भारत आता लस निर्मितीचे केंद्र बनत आहे. भारताने यापूर्वीच अनेक देशांना टप्प्याटप्प्यांमध्ये करोनाची लस देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. भारताकडून सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मोरक्को, बांगलादेश आणि म्यानमारने करोनाची लस घेतली आहे. इतकचं नाही तर चीनचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या कंबोडियानेही भारतीय लसीची मागणी केलीय.

अफगाणिस्तानला लवकरच तर श्रीलंकेलाही पाठवणार पाच लाख डोस

भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान करोना लसीसंदर्भात चर्चा सुरु आहे. स्थानिक औषध प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर भारत अफगाणिस्तानमध्ये लस पुरवठा करेल असं भारताने स्पष्ट केलं आहे. अफगाणिस्तान हे मित्रराष्ट्र असून आमच्या प्राधान्यक्रमामध्ये तुम्ही आहात असा विश्वास भारताने अफगाणिस्तानला दिला आहे. भारताकडून बुधवारी म्हणजेच २७ जानेवारी रोजी श्रीलंकेला करोना लसीचे पाच लाख डोस पाठवण्यात येणार आहेत.