देशातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे दिवसेंदिवस करोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर टाकत आहे. भारतात रविवारी विक्रमी रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील करोना कधी नियंत्रणात येणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी उत्तर दिलं आहे. “दिवाळीपर्यंत देशात करोना प्रसार नियंत्रणात येईल,” असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

अनंतकुमार फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नेशन फर्स्ट वेबीनार सीरिजचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी उद्घाटन केलं. करोना नियंत्रणात आणण्यासाठी भारताची कामगिरी चांगली आहे, असं त्यांनी सांगितलं.

“या वर्षी दिवाळीपर्यंत करोना नियंत्रणाखाली येईल. नेत्यांसह सर्वसामान्य माणसांनी करोनाच्या साथीविरूद्ध एकजुटीनं व प्रभावीपणे लढा दिला आहे. भारतात करोनाचा पहिला रुग्ण आढळून येण्याच्या आधीच आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीच्या आजपर्यंत २२ बैठका झाल्या आहेत,” असं हर्ष वर्धन म्हणाले.

“फेब्रुवारीपर्यंत एकच प्रयोगशाळा होती. त्यात वाढ करण्यात आली असून, देशभरात १ हजार ५८३ प्रयोगशाळा आहेत. यापैकी एक हजाराहून अधिक सरकारी प्रयोगशाळा आहेत. देशात सुमारे दिवसाला १० लाख चाचण्या घेतल्या जात असून, याची संख्या ठरवण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा खूप जास्त आहे,” असंही ते म्हणाले.

“पीपीई किट्स, व्हेटिंलेटर आणि एन ९५ मास्क यांची टंचाई आता राहिलेली नाही. देशात दररोज पाच लाख पीपीई किट तयार केल्या जात आहेत. १० उत्पादक एन ९५ मास्कचं उत्पादन करत आहेत. २५ उत्पादक व्हेटिंलटर तयार करत आहेत. वर्ष अखेरीपर्यंत लस तयार होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आहोत,” असं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.