बाधितांचे प्रमाण ५.६२ टक्क्य़ांवर

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत १,१४,४६० करोनाबाधितांची नोंद झाली असून, गेल्या ६० दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे. याचवेळी बाधितांचे प्रमाण ५.६२ टक्क्य़ांपर्यंत घसरले आहे.

करोना संसर्गाच्या नव्या प्रकरणांमुळे देशातील करोनाबाधितांची संख्या २,८८,०९,३३९ इतकी झाली आहे. याच कालावधीत २६७७ जणांचा करोनाने मृत्यू झाला, जो गेल्या ४२ दिवसांतील सर्वात कमी आकडा आहे. यामुळे करोनामृत्यूंचा एकूण आकडा ३,४६,७५९ वर पोहचला आहे; तर उपचाराधीन रुग्णांची संख्या १५ लाखांहून कमी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

यापूर्वी ६ एप्रिलला २४ तासांच्या कालावधीत एकूण ९६,९८२ करोनाबाधितांची नोंद झाली होती.

चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण कमी होऊन ते ५.६२ टक्क्य़ांवर आले आहे. सलग १३ दिवस ते १० टक्क्य़ांहून कमी राहिलेले आहे, असेही मंत्रालयाने सांगितले. करोनाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या १४,७७,७९९ पर्यंत, म्हणजे एकूण प्रकरणांच्या ५.१३ टक्क्य़ांपर्यंत कमी झाली आहे; तर बरे होण्याचे प्रमाण वाढून ९३.६७ टक्के झाले आहे.

राज्यनिहाय मृत्यू

गेल्या २४ तासांत मृत्युमुखी पडलेल्या २६७७ जणांपैकी ७४१ महाराष्ट्रातील, ४४३ तमिळनाडूतील, ३६५ कर्नाटकमधील, २०९ केरळमधील, १२० उत्तर प्रदेशातील, तर ११८ पश्चिम बंगालमधील आहेत.