करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात करोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. या लाटेत देशात जगातील विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली. आता हळूहळू नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. तर दुसरीकडे करोना मृत्यूची लाट आल्याचंच दृश्य आहे. देशात गेल्या महिनाभरापासून दररोज चार हजारांच्या आसपास करोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. गेल्या २४ तासांतील मृत्यूची आकडेवारीही भयावह असून, देशात एका दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली आहे.

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्र, दिल्लीत उद्रेक झाल्यानंतर गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये करोना परिस्थिती बिकट बनली आहे. करोना आणि करोनानंतर उद्भवणाऱ्या व्याधींमुळे देशात मोठ्या संख्येनं मृत्यू होत आहेत. देशात करोनामुळे प्राण गमवाव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या २४ तासांतील आकडेवारी झोप उडवणारी आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील २४ तासांत म्हणजे मंगळवारी दिवसभरात दोन लाख ६७ हजार ३३४ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात तीन लाख ८९ हजार ८५१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. असं असलं तरी वाढत्या मृत्यू संख्येनं देशाची चिंता वाढवली आहे. गेल्या २४ तासांत आतापर्यंतची उच्चांकी मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात मंगळवारी चार हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या दोन लाख ८३ हजार २४८ वर जाऊन पोहोचली आहे.

यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात ६७९ मृत्यू झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक ५२५, तामिळनाडू ३६४ या राज्यांचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात २८ हजार ४३८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर कर्नाटकात ३० हजार आणि तामिळनाडूत ३३ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

गुजरातमध्ये ७१ दिवसात सव्वालाख मृत्यूंची नोंद

‘दैनिक भास्कर’च्या गुजराती दैनिकाने गुजरातमधील मृतांच्या आकडेवारीबद्दल विशेष वृत्त प्रसिद्ध केलं आहे. १ मार्च २०२१ ते १० मे २०२१ या कालावधी राज्यात वाटप करण्यात आलेल्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आकडेवारीची पडताळणी करण्यात आली. यातून डोळे विस्फारुन टाकणारी माहिती उजेडात आली आहे. ३३ जिल्हे आणि ८ महापालिकांद्वारे ७१ दिवसांमध्ये १ लाख २३ हजार ८७१ मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. तर विरोधाभास म्हणजे राज्यात केवळ ४ हजार २१८ जणांचाच करोनामुळे मृत्यू झाल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. त्यामुळे गुजरातमध्ये ७१ दिवसात सव्वा लाख लोकांचा मृत्यू कशामुळे झाला, असा प्रश्न आता उभा राहिला आहे.