एकीकडे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तौते चक्रीवादळ दाणादाण उडवत असताना दुसरीकडे करोनामुळे होत असलेल्या मृत्यूचं वादळ देशावर अजूनही घोंगावत असल्याचं चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशात करोना रुग्णावाढीचा आलेख कमी झाला आहे. मात्र, होत असलेल्या मृत्यूचं मोठं उभं राहिल आहे. देशातील एकूण करोनाबळींची संख्या पावणेतीन लाखांवर पोहोचली असून, गेल्या २४ तासांत चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत दोन लाख ८१ हजार ३८६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, तीन लाख ७८ हजार ७४१ जण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात याच कालावधीत ४ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार ३९० वर पोहोचली आहे.

राज्यांना पुढील तीन दिवसांत ५१ लाख लस मात्रा

राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना पुढील तीन दिवसांत ५१ लाख लस मात्रा देण्यात येणार असून त्यांच्याकडे अजून १.८४ कोटी मात्रा शिल्लक आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत २० कोटी लसमात्रा राज्यांना मोफत पुरवल्या आहेत. एकूण पुरवलेल्या लसमात्रांची संख्या २० कोटी २८ लाख ९ हजार २५० अशी आहे. १४ मे रोजी वाया गेलेली लस वगळता १८ कोटी ४३ लाख ६७ हजार ७७२ लस मात्रा वापरण्यात आल्या आहेत. अजून १ कोटी ८४ लाख ४१ हजार ४७८ लस मात्रा राज्यांकडे शिल्लक आहेत.