News Flash

करोना मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख नाही देऊ शकत; केंद्राने न्यायालयात सांगितलं कारण

करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे... या मागणीवर केंद्राने भूमिका मांडली.

हे छायाचित्र प्रातिनिधिक स्वरूपात वापरण्यात आलं आहे. (अभिनव साहा। इंडियन एक्स्प्रेस)

करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः थैमान बघायला मिळालं. दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे आरोग्यसुविधांचं वास्तव समोर आलंच, पण यामुळे करोनाबाधित झालेल्या हजारो रुग्णांना आपले प्राण गमावावे लागले. दुसऱ्या लाट शिगेला पोहोचलेली असताना देशात ४ ते ४,५०० हजारांच्या सरासरीने मृत्यू नोंदवले गेले. यावरून केंद्र सरकारला टीकेचं धनी व्हावं लागलं. दरम्यान, करोनाबळी ठरलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. त्यावर केंद्राने आपली भूमिका मांडली.

पहिल्या लाटेपेक्षाही दुसऱ्या लाटेनं देशाला तडाखा दिला. संसर्गाचा वेग जास्त असल्यानं दररोज बाधितांची संख्या मोठी होती. त्यामुळे आरोग्य सेवांवरही प्रचंड ताण पडला होता. असंख्य रुग्णांना वेळेत उपचार, औषधी आणि ऑक्सिजन न मिळाल्याने आपले जीव गमवावे लागले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे (२० जूनची आकडेवारी) देशात ३ लाख ८६ हजार, ७१३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर केंद्राने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाई देऊ शकत नाही, कारण आपत्ती व्यवस्थापन कायद्यात केवळ भूकंप, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बळी ठरलेल्यांनाच मदत करण्याची तरतूद आहे. जर करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपये नुकसान भरपाई द्यायची म्हटलं, तर एसडीआरएफ फंडातील सर्वच रक्कम संपून जाईल. आणि एकूण खर्चही वाढू शकतो, असं केंद्रानं न्यायालयाला सांगितलं आहे.

“एसडीआरएफ फंडातील सर्वच निधी करोनाबळींच्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्यासाठी वापरण्यात आला, तर करोनासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांसाठी, विविध अत्यावश्यक औषधी आणि पुरवठा साहित्यासाठी किंवा चक्रीवादळं आणि पूर परिस्थितीबद्दल मदत करण्यासंदर्भात राज्यांकडे पैसाच राहणार नाही. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी राज्य सरकारच्या आर्थिक क्षमतेपलीकडची आहे,” केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडताना म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 9:56 am

Web Title: covid death updates compensation to victims of covid19 4 lakh compensation centre govt supreme court bmh 90
Next Stories
1 ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर आम्हाला भाषण देऊ नका’; केंद्रीय मंत्र्यांनी सोशल मीडिया कंपन्यांना फटकारले
2 देशात ७४ दिवसांत सर्वात कमी रुग्ण
3 मध्य प्रदेशातून मुंबईत आलेला शस्त्रसाठा जप्त
Just Now!
X