हैदराबादमधील गांधी रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या एका पत्रकाराचा करोनामुळे रविवारी मृत्यू झाला. “प्लिज मला खासगी रुग्णालयामध्ये हलवा. अनेकदा विनंती आणि आठवण करुन दिल्यानंतरही येथील आयसीयूमध्ये माझ्याकडे दूर्लक्ष केलं जात आहे,” असे या पत्रकाराचे शेवटचे शब्द ठरले. ३२ वर्षीय मनोजच्या दुर्देवी मृत्यृची बातमी डेक्कन क्रॉनिकलने दिली आहे.

मनोजचे निधन होण्याआधी त्याचे शेवटचे बोलणे गांधी रुग्णालयामधील मित्राशी झाले होते. “इथला आयसीयू चांगला नाहीय. आपण खासगी रुग्णालयामध्ये जाऊयात. इथे कोणीच माझी काळजी घेत नाहीय. मला या ठिकाणावरुन हलवा,” अशी विनंती मनोजने त्याच्या मित्राकडे केली होती. मदनपेठ येथे राहाणाऱ्या मनोजच्या भावाला करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर मनोजलाही करोना झाल्याचे उघड झाल्यावर त्याच्यावरही गांधी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. उपचारादरम्यान मनोजने मोबाइल फोनवरुन मित्राशी संवाद साधताना दिलेल्या माहितीवरुन गांधी रुग्णालयातील कारभार उघड केला आहे.

करोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाल्यानंतर मनोजने गांधी रुग्णालयात धाव घेतली. मात्र बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगत त्याला आधी रुग्णालय प्रशासनाने भरती करुन घेण्यास नकार दिल्याची माहिती मनोजच्या मित्राने दिली आहे. “आपल्याला बेड मिळणार नाही या भितीने मनोजने तातडीने मला फोन केला. रुग्णालय प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन बेड उपलब्ध करुन देण्यासंदर्भात त्याने मला विनंती केली,” अशी माहिती मनोजच्या मित्राने दिली. फोनवर मनोजचा आवाज घाबरल्यासारखा येत होता असंही या मित्राने सांगितलं.

दोन तास रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातल्यानंतर मनोजला एक बेड उपलब्ध करुन देण्यात आला. चार दिवस रुग्णालयामध्ये दाखल असताना मनोज मेसेजेसवरुन सतत त्याच्या मित्राच्या संपर्कात होता. या संवादादरम्यान मनोजने रुग्णालयात मिळत असणाऱ्या ट्रीटमेंटची माहिती मित्राला दिली. पत्रकार मित्रांपैकी आरोग्य क्षेत्राशी संबंधित पत्रकारांना फोन करुन आरोग्यमंत्र्यांच्या मदतीने आपल्याला अधिक चांगली ट्रीटमेंट दिली जावी म्हणून मनोज प्रयत्न करत होता. अखेर आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून रुग्णालय प्रशासनाला फोन करुन मनोजला चांगली ट्रीटमेंट देण्यासंदर्भात सूचना केल्या.

मात्र एवढं सगळं करुनही मनोजला चांगली वागणूक मिळाली नाही. त्याला चांगले अन्न देण्यात आले नाही असा आरोप मनोजच्या मित्राने केला आहे. अखेर चार दिवस लढा दिल्यानंतर मनोजचा रविवारी मृत्यू झाला.