पाटणा, लखनऊ : कोविड-१९ मुळे जवळपास एका महिन्यापूर्वी बिहारमध्ये जारी करण्यात आलेली टाळेबंदी बुधवारपासून उठविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी समाजमाध्यमांवरून जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व म्हणजे ७५ जिल्ह्य़ांमधील उपचाराधीन रुग्णांची संख्या ६०० हून कमी झाल्याने राज्य सरकारने मंगळवारी सर्व जिल्ह्य़ांमधील कोविड-१९ निर्बंध शिथिल केले.

राज्यातील आपत्कालीन व्यवस्थापन गटाची एक बैठक झाली त्यामध्ये राज्यातील करोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर नितीशकुमार यांनी टाळेबंदी उठविणार असल्याची घोषणा केली.

टाळेबंदीमुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे उद्दिष्ट साध्य झाले, त्यामुळे काही निर्बंधांसह टाळेबंदी उठविण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तथापि, सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत जारी असलेली रात्रीची संचारबंदी कायम राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे, सायंकाळी ४ वाजेपर्यंत ही कार्यालये सुरू राहतील तर दुकाने सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये निर्बंध शिथिल

उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व म्हणजे ७५ जिल्ह्य़ांमधील उपचाराधीन रुग्णांची संख्या ६०० हून कमी झाल्याने राज्य सरकारने मंगळवारी सर्व जिल्ह्य़ांमधील कोविड-१९ निर्बंध शिथिल केले.

तथापि, सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी आणि सप्ताहाच्या अखेरीस (पूर्ण दिवस) लागू करण्यात आलेली संचारबंदी राज्यभर कायम राहणार आहे, असे अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.

सोमवारी मेरठ, लखनऊ आणि गोरखपूर वगळता अन्य ७२ जिल्ह्य़ांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले. सर्व जिल्ह्य़ांमध्ये बुधवारपासून सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत लागू करण्यात आलेली संचारबंदी शिथिल करण्यात येणार आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ६०० हून कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च्चस्तरीय बैठकीत कोविड-१९ स्थितीचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत ७९७ जणांना करोनाची लागण झाली.

कर्नाटकात डॉक्टरांच्या मृत्यूची संख्या कमी

बेंगळुरू : कर्नाटकात करोनाच्या दुसऱ्या लाटेत बळी पडलेल्या डॉक्टरांची संख्या कमी असून  देशातील तो नीचांक आहे,  अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी दिली. सुधाकर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकलेल्या माहितीनुसार कर्नाटकात डॉक्टरांच्या मृत्यूचा दर कमी होता. देशात ६४६ डॉक्टरांचा मृत्यू झाला असून कर्नाटकातील मरण पावलेल्या डॉक्टरांची संख्या त्यात केवळ आठ आहे. कोविड योद्धय़ांच्या संरक्षणासाठी सरकारने घेतलेल्या दक्षतेचाच हा पुरावा आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत १०९, बिहारमध्ये ९७,  उत्तर प्रदेशात ७९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकात सोमवारी ११९५८ नवीन रुग्ण सापडले असून ३४० नवीन मृत्यूंची नोंद झाली आहे.  राज्यात आतापर्यंतची रुग्णसंख्या २७ लाख ७ हजार ४८१  असून एकूण ३१९२० जणांचा मृत्यू झाला आहे.