जगभरामध्ये पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जातेय. मात्र एकीकडे लसीकरण सुरु असल्याने करोनावर आपण नक्की मात करु असा दावाही काही तज्ज्ञांकडून आत्मविश्वासाने केला जातोय. मात्र लसीकरणानंतरही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. असं असतानाच आता इंग्लंडमधील नागरी आरोग्य विभागाच्या लसीकरण विभागाच्या प्रमुख असणाऱ्या डॉ. मेरी रॅमसे यांनी एक मोठा दावा केलाय. पुढील काही वर्षांसाठी आपल्या सर्वांनाच सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडावर मास्क घालून फिरावं लागेल, असं डॉ. रॅमसे म्हणल्या आहेत.

डॉ. रॅमसे यांनी जगभरातील लोकांना आता काही प्रमाणात निर्बंधांची सवय लावणं गरजेचं आहे असंही म्हटलं आहे. पुढील काही वर्षांसाठी आपल्याला हे नियम पाळावे लागणार आहेत. या निर्बंधांच्या आधाराचे आपल्याला अर्थव्यवस्थेला चालना द्यावी लागणार आहे. सरकारलाही कोणतेही निर्बंध हटवण्याआधी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, असा इशाराही रॅमसे यांनी दिल्याचं बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

डॉ. रॅमसे यांनी, “जास्त उपस्थिती असणाऱ्या कार्यक्रमांवर आयोजकांबरोबरच प्रशासनालाही अधिक काळजीपूर्वक पद्धतीने लक्ष द्यावं लागणार आहे. तसेच या अशा कार्यक्रमांसंदर्भात स्पष्ट निर्देश आणि नियम आखून देण्याचीही गरज आहे,” असंही म्हटलं आहे. जगभरातील सर्वच भागांमध्ये करोना लसीकरण योग्य प्रमाणामध्ये झालं. त्यानंतर जगभरातील करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये परिस्थिती करोना पूर्व काळासारखी असेल असंही डॉ. रॅमसे यांनी म्हटलं आहे. जगभरातील सर्वच सरकारी यंत्रणांनी अगदी विचारपूर्वक पद्धतीने निर्बंध उठवण्यासंदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे. कोणीही तातडीने निर्बंध उठवण्याची घाई करु नये. वयस्कर व्यक्तींना आणि इतर आजार असणाऱ्यांना करोनाचा अगदी वेगाने संसर्ग होऊ शकतो हा धोका लक्षात घेणं गरजेचं आहे, असंही डॉ. रॅमसे यांनी स्पष्ट केलं आहे.

भारतामध्ये सध्या अनेक राज्यांमध्ये करोनासंदर्भातील नियम शिथिल करण्यात आले आहेत. मागील काही आठवड्यांपासून भारतात पुन्हा एकदा करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. खास करुन महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये करोना बाधितांची संख्या वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही शहरांमध्ये मोजक्या प्रमाणात निर्बंध लादण्यात आलेत. फ्रान्ससारख्या देशामध्येही करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे एका महिन्यासाठी पॅरिससहीत १६ ठिकाणी लॉकडाउनची घोषणा करण्यात आलीय.