News Flash

गुजरातमध्ये खळबळजनक घटना : करोना रुग्णाचा मृतदेह आढळला बस स्टँडवर

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिले चौकशीचे आदेश

करोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत असताना सध्या अनेक नियमांचं पालन करावं लागत आहे. मात्र असं असताना गुजरातमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. एका करोना रुग्णाचा मृतदेह चक्क बस स्टँडवर आढळला आहे. या प्रकरणी आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

याबाबत द क्विंटने दिलेल्या वृत्तानुसार, मृत रुग्णाच्या मुलानं सांगितलं की, त्यांच्या ६७ वर्षीय वडिलांना १० मे रोजी अहमदाबाद सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचा रिपोर्ट आला होता. १५ मे रोजी आम्हाला पोलिसांचा कॉल आला. त्यांनी सांगितलं की, अहमदाबादमधील दनिलिम्डा क्रॉसिंगजवळील बस स्टँडवर तुमच्या वडिलांचा मृतदेह आढळला आहे.

याबाबत अहमदाबाद सरकारी रुग्णालयाचे अधिकारी डॉ. एम.एम. प्रभाकर यांनी सांगितले की, या रुग्णाला फार क्वचित प्रमाणात करोनाची लक्षणे होती आणि नियमानुसार त्यांना घरी विलगीकरणार राहण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांना १४ मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. जेव्हा त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, तेव्हा त्यांची प्रकृती ठीक होती.

डॉ. प्रभाकर यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या वाहतूक व्यवस्थेद्वारे त्यांना घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, घरापर्यंत जाण्यामध्ये खूप ट्राफिक होते. त्यामुळे त्यांना घराजवळील बस स्टँडवर सोडण्यात आले. पंरतु त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या डिस्चार्जबद्दल माहिती दिली होती की नाही, हे आताच सांगता येणार नाही, असेही डॉ. प्रभाकर यांनी स्पष्ट केले

या प्रकरणी आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोग्य खात्याच्या माजी अतिरिक्त सचिवांच्या मार्फत याची चौकशी केली जाणार आहे. येत्या २४ तासांत अहवाल द्यावा, असे त्यांना सांगण्यात आले आहे.

गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी मात्र, गुजरात सरकारवर याप्रकरणी टीका केली आहे. “सरकार करोना संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरतंय. नियोजनाचा अभाव आहे. या प्रकरणाची रुपाणी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा,” अशी मागणीही मेवाणी यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2020 6:12 pm

Web Title: covid patient s body found at ahmedabad bus stand gujarat cm orders probe pkd 81
टॅग : Coronavirus,Gujarat
Next Stories
1 उत्तर प्रदेशात मजुरांचा उद्रेक, सीमारेषेवर बॅरिकेट्स तोडत केला राज्यात प्रवेश
2 मोदी सरकारला काँग्रेसचं चॅलेंज : पॅकेज २० लाख कोटी नव्हे ३.२२ लाख कोटींचंच..
3 मजूर आणि कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही, ते आमची जबाबदारी – अरविंद केजरीवाल
Just Now!
X