टाळेबंदी शिथिलीकरणाचा तिसरा टप्पा : रात्रीची संचारबंदी मागे

मुंबई/नवी दिल्ली : टाळेबंदी शिथिलीकरणाचा तिसरा टप्पा १ ऑगस्टपासून सुरू होणार असून, त्यासाठी केंद्रासह राज्याने बुधवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यानुसार राज्यात मॉल्स आणि व्यापारी संकुले ५ ऑगस्टपासून खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे प्रवासाबाबत मात्र संदिग्धता आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम ठेवले आहेत. यापूर्वी दुकाने, खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता मॉल्स किं वा व्यापारी संकु लांमधील फक्त दुकाने उघडण्यास ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. मॉलमधील उपाहारगृहे, चित्रपटगृहे मात्र बंदच राहतील. मॉलमधील उपाहारगृहांमधून फक्त घरपोच सेवा देता येईल.

सरकारी कार्यालयांमध्ये एकूण कर्मचारी क्षमतेच्या १५ टक्के  किं वा १५ कर्मचारी तर खासगी आस्थापनांमध्ये एकू ण क्षमतेच्या १० टक्के  किं वा दहा कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती कायम असेल. रात्रीची संचारबंदी मागे घेण्यात आली आहे.

व्यायामशाळांना केंद्राची परवानगी, राज्याची मनाई

केंद्र सरकारने व्यायामशाळांना ५ ऑगस्टपासून परवानगी दिली. त्यासाठीची कार्यप्रणाली आरोग्य मंत्रालयाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले. राज्य सरकारने मात्र व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. तरण तलावही बंद राहतील. मोकळ्या जागेत गोल्फ, नेमबाजी, टेनिस, बॅडमिंटन, मल्लखांब यांना परवानगी देण्यात आली आहे. पण, सांघिक नव्हे, तर वैयक्तिक पातळीवर हे खेळ खेळता येतील.

वाहनांतील प्रवासी संख्येत वाढ

१ ऑगस्टपासून टॅक्सी, ओला-उबरमध्ये चालक आणि तीन प्रवासी म्हणजेच चार जणांना परवानगी असेल. रिक्षामध्ये चालक आणि दोन, अन्य चारचाकी वाहनांमध्ये चालक आणि तीन प्रवाशांची वाहतूक करता येईल. दुचाकीवर दोघांना परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाअंतर्गत प्रवासावर निर्बंध नसतील. मुंबई महानगर क्षेत्र वगळता इतरत्र आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास आवश्यक असेल.

उपाहारगृहांवर निर्बंध कायम

गर्दी होण्याची शक्यता असलेली ठिकाणे सुरू करण्यास अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. निवासाची व्यवस्था असलेली हॉटेल्स सुरू करण्यास आधीच परवानगी देण्यात आली असली तरी उपाहारगृहांचा निर्णय घेण्यात आलेला नाही. उपाहारगृहांमध्ये बसून खाद्यपदार्थाचे सेवन करता येणार नाही.

शाळा-महाविद्यालये बंदच

केंद्र सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत शाळा-महाविद्यालये व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातही शाळा व महाविद्यालये बंदच राहतील.

मुंबईसह १८ महापालिकांमध्ये निर्बंध लागू

राज्यात प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लागू असलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. हे निर्बंध मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी, उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या महानगरपालिका क्षेत्रांत तर अंबनरनाथ, कु ळगाव-बदलापूर या नगरपलिका हद्दीत लागू असतील.

टाळेबंदीतून शिथिलता, पण सावधपणे : मुख्यमंत्री

मुंबई : स्थानिक पातळीवरील गरज म्हणून राज्यातील विविध शहरांत जुलैमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली. टाळेबंदीतून सरसकट शिथिलता न देता सावधपणे पावले उचलू. मुंबई महानगर प्रदेशात मात्र राज्याच्या इतर भागांपेक्षा जास्त सावधगिरी बाळगावी लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट केले. टाळेबंदी हे धोरण नसून, निर्बंध शिथिल करणे हेच धोरण आहे. पण, ते करताना सावधगिरी बाळगायची आहे. त्यासाठीचे निर्णय आपण सर्वजण मिळून घेऊ, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत नमूद के ले.