देशात करोनामुळ हाहाकार माजला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. त्याचबरोबर मृत्यूचा आकाडाही दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम आणखी जलदगतीने करण्याचं आव्हान तज्ज्ञांकडून वारंवार करण्यात आलं आहे. यासाठी सरकारनं १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचं जाहीर केलं. मात्र लशींचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक ठिकाणी करोना लसीकरण केंद्र बंद आहेत. काही राज्यांनी तर १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण बंद केलं आहे. त्यामुळे लशींचा पुरवठा वाढण्याची मागणी होत आहे. त्यात आता रशियातून स्पुटनिक व्ही लशीची दुसरी खेप उद्या भारतात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लसीकरण मोहिमेला वेग येईल असं सांगण्यात येत आहे.

स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप १ मे रोजी भारतात आली होती. आता लशीची दुसरी खेप उद्या भारतात पोहोचणार आहे. भारतात स्पुटनिक व्ही लशीची निर्मिती रेड्डीज लॅबोरेटरीज करणार असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लशीस केंद्रीय औषध प्रमाणन व नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे.

भारताच्या औषध महानियंत्रकांनी जानेवारीत भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन व ऑक्सफर्ड—अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या सीरमने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड या लशींना मान्यता दिली होती. स्पुटनिक व्ही लस आयात करण्याची परवानगी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने मागितली होती. ही लस मे. गमालिया इन्स्टिटय़ूट यांनी तयार केली असून लशीच्या उत्पादनासाठी रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांच्याशी करार केला आहे.

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीस परवानगी

स्पुटनिक व्ही लसीची परिमामकारकता ९२ टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे. स्पुटनिक व्ही लस एस्ट्राजेनेकाच्या लसीसारखी एक व्हायरल वेक्टर लस आहे. मात्र या लसीचे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत. या लसीचे दोन डोस वेगवेगळे असल्याने करोनावर दूरगामी परिणाम दिसत आहेत. या लसीला आतापर्यंत ६०हून अधिक देशांनी मान्यता दिली आहे.