फायझर पाठोपाठ अमेरिकेत मॉर्डनाच्या लसीला मान्यता देण्यात आली आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मॉर्डनाच्या लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. अमेरिकेत फायझरच्या लसीचे डोस देण्यास सुरुवात झालेली असताना, आता मॉर्डनचा लसीचे डोसही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाले आहेत. अमेरिकेत अलीकडे करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

मॉर्डना लसीला मान्यता मिळाल्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करुन अभिनंदन केले आहे. ‘अभिनंदन मॉर्डनाची लस आता उपलब्ध आहे’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. पुढच्या काही दिवसात मोठया प्रमाणावर नागरिकांना मॉर्डना लसीचे डोस दिले जातील. अमेरिकेत हजारो आरोग्य सेवकांना फायझर लसीचे डोस दिले जात आहेत.

करोना व्हायरसपासून संरक्षण देण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यात मॉर्डनाची लस मानवी चाचणीमध्ये ९५ टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले होते. तिसऱ्या स्टेजमध्ये ३० हजार नागरिकांवर मॉर्डना लसीची चाचणी करण्यात आली. चालू आठवडाअखेरीस ५० लाखापेक्षा जास्त लसीच्या डोसचे वितरण करण्यासाठी मॉर्डना अमेरिकन सरकार सोबत मिळून काम करत आहे. मॉर्डना आणि फायझर या दोन्ही लसी MRNA तंत्राने विकसित करण्यात आल्या आहेत.