मागील काही दिवसांपासून दिल्लीत करोनाबाधितांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना कोणतीही चिता न करण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांची संख्या वाढत असल्यानंच करोनाबाधितांची संख्याही वाढत असल्याचे ते म्हणाले. दिल्लीतील सर्वाधित लोकांमध्ये करोनाची सूक्ष्म लक्षणं आहेत. त्यामध्ये रूग्णांना रूग्णालयात दाखल होण्याची गरज भारत नाही. अशा परिस्थितीत रुग्ण हा आपल्या घरीच बरा होतो, असं केजरीवाल म्हणाले. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी याबाबत माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत दररोज ३ हजार करोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत चाचणी वाढवल्यामुळेच ही संख्या वाढली असल्याचे केजरीवाल म्हणाले. “यापूर्वी दररोज ५ ते ६ हजार चाचण्या होत होत्या. परंतु आता १८ ते २० हजार चाचण्या होत आहेत. पूर्वी कमी चाचण्या होत असूनही २ हजार रूग्ण समोर येत होते. तर आता अधिक चाचण्या केल्यानंतरही तीन ते साडेतीन हजार रूग्णच समोर येत आहेत,” असं त्यांनी सांगितलं.

“दिल्लीतील ७४ हजार रुग्णांपैकी ४५ हजार रूग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे. लोकं वेगानं या आजारातून बाहेर पडत आहेत. सध्या जेवढे रूग्ण आहेत त्यापैकी केवळ ६ हजार रूग्ण रुग्णालयात दाखल आहे आणि उर्वरित हे त्यांच्या घरीच उपचार घेत आहेत,” असंही त्यांनी स्पष्ट केल. तसंच सध्या रुग्णालयात बेड्स उपलब्ध असून नवे रुग्ण येत असले तरी १३ हजार बेड्स तयार असल्याचेही केजरीवाल म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीनं उपचार करण्याची परवानगी मिळाल्याचंही सांगितलं.