देशात लहान मुलांमधील करोना संसर्गाचं प्रमाण वाढत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात येत आहे. एम्पॉवर्ड ग्रुप -१ (Empowered Group-1) कडे उपलब्ध आकडेवारीनुसार, देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजेच या वर्षी मार्च महिन्यापासून एकूण सक्रिय करोना प्रकरणांमध्ये १० वर्षांखालील मुलांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. आकडेवारीनुसार, करोनाच्या एकूण सक्रिय प्रकरणांमध्ये १ ते १० वर्षे वयोगटातील मुलांचं प्रमाण यावर्षी मार्चमध्ये २.८० टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये ७.०४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच प्रत्येक १०० सक्रिय करोना प्रकरणांपैकी सुमारे सात लहान मुलं आहेत.

तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, १ ते १० वर्षे वयोगटातील करोनाची वाढती प्रकरणं हा प्रौढांमधील करोनाचा संसर्ग कमी झाल्याचा परिणाम असू शकतो. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासह विविध मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांच्या अध्यक्षतेखाली ईजी-१ च्या बैठकीत एक डेटा सादर करण्यात आला आहे. या आकडेवारीनुसार मार्चपूर्वी, जून २०२० ते फेब्रुवारी २०२१ या नऊ महिन्यांत १ ते १० वयोगटातील मुलं एकूण सक्रिय प्रकरणांमध्ये २.७२ टक्के ते ३.५९ टक्के या श्रेणीत होती.

संसर्ग वाढण्याचं कारण काय?

एम्पॉवर्ड ग्रुप -१ (EG-1) चा हा अहवाल अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरतो. अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, देशात करोनाची तिसरी लाट ही अपरिहार्य आहे. त्याचप्रमाणे, या लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची भीती देखील वर्तवण्यात आली आहे. लहान मुलांमधील करोनाच्या वाढत्या घटनांबाबत कोणताही विशिष्ट कारण दिलं गेलं नसलं तरीही, “मोठ्या प्रमाणात व्हायरसच्या संपर्कात आल्याने आणि अधिक चाचण्यांमुळे” आकड्यात ही वाढ झालेली असू शकते असं म्हटलं जात आहे.

“रुग्णालयात दाखल होणाऱ्या मुलांचं प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त आहे. हे प्रामुख्याने दोन कारणांमुळे आहे. पहिलं म्हणजे मोठी जागरूकता आणि सतर्कता आहे. दुसरं म्हणजे वाढलेली असुरक्षितता”, असं सूत्रांचं म्हणणं आहे. सेरो सर्वेक्षणात तर लहान मुलांमध्ये करोना पॉझिटिव्हिटीचं प्रमाण ५७ ते ५८ टक्के आहे.

गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही!

“एकूणच मुलांमध्ये करोना प्रकरणांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता आपण याबाबत अधिक लक्ष जागरूक रहाण्याची गरज आहे. मुलांमध्ये रोगाची तीव्रता प्रौढांच्या तुलनेत निश्चितच सौम्य आहे. मात्र, असं असलं तरीही लहान मुलांना करोना संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे असं म्हणण्याइतकी परिस्थिती आता निर्माण झालेली नाही. त्याचप्रमाणे, अशी गंभीर परिस्थिती निर्माण होईल असं वाटत देखील नाही”, असं सूत्रांचं म्हणणं आहे. लहान मुलांमध्ये करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, “रुग्णालयात दाखल होणाऱ्या मुलांचं प्रमाण किरकोळ वाढलं आहे. परंतु, केरळमधून घेतलेल्या धड्यानंतर मृत्यूचं प्रमाण पूर्वीपेक्षा स्थिर किंवा कमी झालं आहे.

खबरदारी काय?

लहान मुलांमधील वाढत्या करोना संसर्गाच्या स्थितीला सामोरं जाण्याच्या धोरणाबद्दल विचारलं असता सूत्रांनी सांगितलं की, Biological E सारखी लस १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आवश्यक मान्यता प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत आहेत. त्याचसोबत, ईजी -१ ने प्रस्तावित केलं होतं की, करोनाच्या पुढच्या म्हणजे तिसऱ्या लाटेत मुलांना बाधा अधिक होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर, खबरदारी म्हणून रुग्णालयांत ५ टक्के आयसीयू बेड्स आणि ४ टक्के नॉन-आयसीयू ऑक्सिजन बेड्स लहान मुलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.

लहान मुलांमधील करोना प्रकरणांची आकडेवारी

ऑगस्ट महिन्यात १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची लहान मुलांमधील करोना प्रकरणांची आकडेवारी उपलब्ध आहे. यानुसार, मिझोराममध्ये लहान मुलांची करोना प्रकरणं सर्वाधिक आणि दिल्लीत सर्वात कमी आहेत. मिझोराम (१६.४८%), मेघालय (९.३५%), मणिपूर (८.७४%), केरळ (८.६२%), अंदमान आणि निकोबार (८.२%), सिक्कीम (८.०२%), दादरा आणि नगर हवेली (७.६९%) आणि अरुणाचल प्रदेश (७.३८%) करोना असलेल्या लहान मुलांचं राष्ट्रीय सरासरी प्रमाण ७.०४ %पेक्षा जास्त आहे.

ऑगस्टमध्ये करोना असलेल्या लहान मुलांचं राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी प्रमाण नोंदवली गेलेली राज्य पुढीलप्रमाणे आहेत : पुडुचेरी (६.९५%), गोवा (६.८६%), नागालँड (५.४८%), आसाम (५.०४%), कर्नाटक (४.५९%), आंध्र प्रदेश (४.५३%) , ओडिशा (४.१८%), महाराष्ट्र (४.०८%), त्रिपुरा (३.५४%) आणि दिल्ली (२.२५%).