देशातील करोनाचे संकट दिवसोंदिवस अधिक गडद होत चालल्याचे चित्र दिसत आहे. याच करोनाच्या मुद्द्यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये अधीर रंजन यांनी करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केलीय. भारतामध्ये १ ऑगस्टपर्यंत १० लाख लोकांचा करोनामुळे मृत्यू होईल असं नुकतच द लॅन्सेटच्या अहवालात म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर संसदेचं अधिवेशन भरवून चर्चा केल्यास सरकारला करोनाविषयक धोरणे ठरवण्यासाठी मदत होईल असं या पत्रात अधीर रंजन यांनी म्हटलं आहे.

“करोनाच्या साथीमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडला आहे याची आपल्याला कल्पना असेल. संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. दैनंदिन रुग्णसंख्या चार लाखांच्या आसपास पोहचत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरामध्ये भिती, नैराश्य, उदासिनता आणि असहाय्यपणाची भावना निर्माण झालीय. प्रत्येक कुटुंबाच्या दारात मरण उभं आहे अशी भिती निर्माण झालीय,” असं पत्राच्या सुरुवातील अधीर रंजन म्हणतात.

“याच पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रकाशित झालेल्या द लॅन्सेट या जागतिक आरोग्य विषयक नियतकालिकेमध्ये भारतातील करोना आपत्कालासंदर्भातील उल्लेख येथे करु इच्छितो ते लिहितात, “आरोग्य व्यवस्थेचे सर्व परिमाण आणि सध्याची परिस्थिती पाहिल्यास भारतामध्ये १ ऑगस्टपर्यंत करोनामुळे १० लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. जरं असं झालं तर त्याला मोदी सरकार जबाबदार असेल. भारताला करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात मिळवलेलं यश त्यांना कायम ठेवता आलं नाही.” असा उल्लेखही या पत्रात करण्यात आलाय.

द लॅन्सेटने केलेल्या उल्लेखानुसार, “भारताला देण्यात आलेल्या आरोग्यविषयक इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, मी संसदेचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करतो. यामध्ये करोनासंदर्भातील सर्व विषय आणि त्याबद्दल घ्यायच्या खबरदारीसंदर्भात चर्चा घडवून आणावी अशी मागणी करतो,” असं अधीर रंजन यांनी पत्रात म्हटलं आहे.

“देशावर आलेल्या या आरोग्यविषयक आप्तकाळावर मात करुन पुन्हा सावरण्यासाठी सदनामध्ये होणारी चर्चा आणि त्यामधून सुचवण्यात आलेले पर्याय नक्कीच फायद्याचे ठरतील. या धोकादायक साथीच्या रोगासंदर्भात नवीन धोरणे आणि निती ठरवताना संसदेच्या सदनामध्ये झालेल्या चर्चेमधील मुद्दे सरकारला नक्कीच उपयुक्त ठरतील,” असंही अधीर रंजन यांनी म्हटलं आहे.