News Flash

आता लसीकरणाची प्रतीक्षा

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन मर्यादित वापरास अंतिम मंजुरी

‘सीरम’ संस्थेने उत्पादित केलेली ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही करोना लशींच्या मर्यादित आपत्कालीन वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी रविवारी परवानगी दिली. त्यामुळे आता लसीकरण मोहीम केव्हा सुरू होते याची प्रतीक्षा आहे.

लशी ११० टक्के सुरक्षित आहेत, परंतु त्यांच्या सुरक्षिततेबद्दल थोडीशी शंका निर्माण झाली तरी आम्ही त्यांना मंजुरी देणार नाही, असे औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी स्पष्ट केले. कोव्हिशिल्ड ७०.४२ टक्के परिणामकारक, तर कोव्हॅक्सिन सुरक्षित असून उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण करते, अशी पुष्टीही सोमानी यांनी जोडली.

‘कोव्हिशिल्ड’ ही लस ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केली आहे. तिचे भारतातील उत्पादन ‘सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक संस्था करीत आहे. ‘कोव्हॅक्सिन’ ही स्वदेशी लस आहे. तिचे उत्पादन भारत बायोटेक ही कंपनी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने करीत आहे. ‘कोव्हॅक्सिन’ या स्वदेशी लशीला मर्यादित प्रमाणात आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. दोन्ही लशींच्या वापरास अंतिम मंजुरी मिळाल्यामुळे आता लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने दोन्ही लशींच्या चाचण्यांची तपशीलवार माहिती घेतल्यानंतर दोन्ही लशींना मंजुरी देण्याची शिफारस औषध महानियंत्रकांना केली होती.

औषध महानियंत्रकांनी करोना तज्ज्ञ समितीच्या अहवालाच्या आधारे दोन्ही लशींना आपत्कालीन वापराची परवानगी दिली असली तरी ‘कोव्हॅक्सिन’ला मंजुरी देताना मर्यादित वापरासाठी परवानगी देत असल्याचे म्हटले आहे. औषध महानियंत्रक डॉ. सोमाणी म्हणाले की सीरम आणि भारत बायोटेक यांच्या लशींना तज्ज्ञ समितीच्या अहवालाआधारे परवानगी देण्यात आली आहे. लशी दोन मात्रेत द्यायच्या असून त्या २ ते ८ अंश तापमानात साठवून ठेवता येतील.

पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूटने चिंपाझीमधील सर्दीच्या विषाणूचा वाहक म्हणून उपयोग करून ‘कोव्हिशिल्ड’ लस तयार केली आहे. त्यासाठी संस्थेने अ‍ॅस्ट्राझेनेका ऑक्सफर्ड विद्यापीठ यांचे तंत्रसाहाय्य घेतले आहे. लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याची माहिती सादर करण्यात आली असून २३,७४५ जणांवर या लशीची चाचणी घेण्यात आली. ते सर्वजण १८ आणि त्याहून जास्त वयाचे होते, असे औषध महानियंत्रकांनी स्पष्ट केले.

‘कोव्हॅक्सिन’बाबत माहिती देताना सोमाणी म्हणाले, की भारत बायोटेकच्या लशीमध्ये ‘होल व्हिरियॉन’ हा निष्क्रिय विषाणू वाहक म्हणून वापरला आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषद आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांच्या मदतीने ही लस तयार केली आहे. व्हेरो सेल प्लॅटफॉर्मवर ही लस तयार केली असून ती सुरक्षित आणि कार्यक्षम आहे. संस्थेने प्राण्यांवर प्रयोगाची माहिती सादर केली असून त्यात उंदीर, घुशी, ससे, सिरियन हॅमस्टर यांच्यावर प्रयोग करण्यात आले होते. त्यात ऱ्हिसस माकडांचा आणि हॅमस्टर्सचा समावेश आहे. ही माहिती भारत बायोटेकने ‘सीडीएससीओ’ला दिली होती. या लशीच्या टप्पा १ व टप्पा २ मधील वैद्यकीय चाचण्या ८०० जणांवर करण्यात आल्या होत्या. त्याचे परिणाम सुरक्षित असून चांगली प्रतिकारशक्ती तयार होण्यास मदत झाली आहे. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू करण्यात आल्या असून २५,८०० स्वयंसेवक त्यात आहेत. एकूण २२,५०० जणांना ही लस देण्यात आली. ती सुरक्षित आहे. तज्ज्ञ समितीने कंपनीने दिलेल्या माहितीच्या आधारे या लशीला मंजुरी देण्याची शिफारस केली होती.

‘सीरम’ने ६ डिसेंबरला, तर भारत बायोटेकने ७ डिसेंबरला लशीला परवानगीसाठी अर्ज केले होते. फायझरनेही ४ डिसेंबरला अर्ज केला असून त्यावर प्रक्रिया चालू आहे. कॅडिला हेल्थकेअर या कंपनीला लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आल्याचेही औषध महानियंत्रकांनी सांगितले.

अभिमानाचा क्षण : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लशींना मान्यता मिळणे हा करोनाविरोधातील लढाईत एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे. दोन्ही लशींना मान्यता मिळणे हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. भारतीय वैज्ञानिक आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी झटत आहेत, हेच यातून दिसून आले, असेही मोदी यांनी नमूद केले. आघाडीवर राहून करोनाशी सामना करणारे आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांच्या कामाबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.

७०.४२ टक्के परिणामकारक

कोव्हिशिल्ड लशीची परिणामकारकता ७०.४२ टक्के आहे. सीरमला आणखी शंभर जणांवर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील नैदानिक चाचण्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या संस्थेने अंतरिम माहिती आधीच सादर केली आहे. सीरमच्या चाचण्या देशात यापुढेही सुरूच राहतील.

‘कोव्हिशिल्ड’ ही देशातील पहिली लस असून ती सुरक्षित व प्रभावी आहे, येत्या काही आठवडय़ांत तिचे वितरण सुरू होईल. आम्ही जोखीम पत्करून ही लस तयार केली त्याचे आज चीज झाले. पंतप्रधान मोदी व आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे आम्ही आभारी आहोत. – अदर पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया
‘कोव्हॅक्सिन’ला मिळालेली परवानगी हा मैलाचा दगड आहे. नवप्रवर्तनातील एक मोठे पाऊल आहे. देशात विकसित केलेले हे अभिनव असे उत्पादन असून कंपनीच नव्हे, तर भारतीय वैज्ञानिकांसाठीही अभिमानाचा क्षण आहे. लस सुरक्षित असून प्रतिकारशक्तीही चांगल्या प्रमाणात निर्माण करते.   – कृष्णा इल्ला, अध्यक्ष, भारत बायोटेक

‘कोव्हॅक्सिन’बद्दल घाई का -काँग्रेस

तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झालेल्या नसताना भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लशीला घाईने मंजुरी दिल्याबद्दल काँग्रेस नेते शशी थरूर आणि जयराम रमेश यांनी नाराजी व्यक्त केली असून आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 2:33 am

Web Title: covishield and covaxin narendra modi mppg 94
Next Stories
1 तोडग्याबाबत आशावाद
2 राष्ट्रीय महिला आयोगाकडे गत वर्षभरात सर्वाधिक तक्रारी
3 राजस्थानमध्ये ‘बर्ड फ्लू’चा इशारा
Just Now!
X