News Flash

लसमात्रांतील अंतर शास्त्रीय आधारावरच

इंग्लंडमध्ये ‘ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका’ (भारतातील कोव्हिशिल्ड) लशीचा वापर केला जातो.

लसमात्रांतील अंतर शास्त्रीय आधारावरच
आतापर्यंत देशात कोव्हिशिल्डच्या २१.१७ कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : कोव्हिशिल्ड लशीच्या दोन मात्रांमधील कालावधी वाढवण्याचा निर्णय पारदर्शक व शास्त्रीय माहितीच्या आधारावर घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी बुधवारी दिले. लसीकरणासंदर्भातील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे (एनटीएजीआय) प्रमुख एन. के. अरोरा यांनीही त्याचे समर्थन केले. मात्रांमधील अंतर १२-१६ आठवड्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली नसल्याचे मत या गटातील काही सदस्यांनी व्यक्त केल्यानंतर वाद निर्माण झाला.

कोव्हिशिल्डच्या पहिल्या व दुसऱ्या लसमात्रेमधील अंतर किमान ४-६ आठवड्यांवरून १२-१६ आठवडे करण्याचा निर्णय १३ मे रोजी घेण्यात आला होता. या लशीच्या दोन मात्रांमधील कालावधी तीन वेळा बदलण्यात आला. १६ जानेवारी रोजी दोन मात्रांमधील कालावधी ४-६ आठवड्यांचा करण्यात आला होता. त्यानंतर २२ मार्च रोजी तो ६-८ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आला होता आणि आता तो १२-१६ आठवड्यांचा करण्यात आला आहे.

दोन मात्रांमधील कालावधी वाढवण्यासंदर्भात ‘एनटीएजीआय’ने केलेल्या शिफारशीमध्ये कोणत्याही सदस्याने असहमतीचे पत्र जोडलेले नव्हते, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. हा निर्णय शास्त्रीय माहितीच्या आधारावर व पारदर्शी होता. वेळोवेळी होणाऱ्या शास्त्रीय संशोधनातील बदलांचे यथोचित मूल्यमापन करण्याची यंत्रणा भारताकडे आहे. लसीकरणासारख्या महत्त्वाच्या विषयावर राजकारण केले जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

‘एनटीएजीआय’चे प्रमुख एन. के. अरोरा यांनी कालावधी वाढवण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना इंग्लंडमधील शास्त्रीय माहितीचे उदाहरण दिले. इंग्लंडमध्ये ‘ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका’ (भारतातील कोव्हिशिल्ड) लशीचा वापर केला जातो. या लशीच्या दोन मात्रांमधील कालावधी १२ आठवड्यांचा केल्यानंतर लसीकरणाची उपयुक्तता ६५ टक्क्यांवरून ८८ टक्क्यांपर्यंत वाढली. कालावधीतील वाढीचा इंग्लंडला झालेला फायदा लक्षात घेऊन भारतातही ‘कोव्हिशिल्ड’च्या दोन मात्रांमधील कालावधी १२-१६ आठवड्यांचा करण्यात आला आहे. या निर्णयाला शास्त्रीय आधार असल्याचा युक्तिवाद अरोरा यांनी केला.

अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, कालावधी वाढवण्याचा ‘एनटीएजीआय’चा निर्णय सामूहिक होता. जसजशी शास्त्रीय माहिती हाती येते, त्यानुसार निर्णयात बदल केले जात आहेत. ४-६ आठवड्यांच्या कालावधीनंतर दुसरी मात्रा घेतली तर लशीच्या उपयुक्ततेचे प्रमाण ५७-६० टक्के आढळून आले. इंग्लंडमध्ये झालेल्या संशोधनामध्ये अ‍ॅस्ट्राझेनेकाची पहिली मात्रा घेतल्यानंतर ३३ टक्के व दुसरी मात्रा घेतल्यानंतर ६० टक्के उपयुक्तता सिद्ध झाली होती.

‘एनटीएजीआय’चे तीन तज्ज्ञ सदस्य एम. डी. गुप्ते, मॅथ्यू व्हर्गिस आणि जे. पी. मुळीयिळ यांनी १२-१६ आठवड्यांच्या कालावधीची सूचना केली नसल्याचा दावा एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला. दोन मात्रांमधील कालावधी ८-१२ आठवड्यांपर्यंत वाढवण्याबाबत आम्ही फक्त चर्चा केली होती, पण १२-१६ आठवड्यांचा निर्णय सरकारने स्वत:च्या अखत्यारीत घेतलेला आहे. हा निर्णय कदाचित योग्य असेल वा नसेलही. पण याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही, असे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी’ या सरकारी संस्थेचे माजी संचालक एम. डी. गुप्ते यांचे म्हणणे आहे. मॅथ्यू यांच्या म्हणण्यानुसार, ‘एनटीएजीआय’ने फक्त ८-१२ आठवड्यांची शिफारस केली होती. १२-१६ आठवड्यांबाबत विशेषत्वाने चर्चा केलेली नव्हती, असे मुळीयिळ यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. आतापर्यंत देशात कोव्हिशिल्डच्या २१.१७ कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

‘कालावधीबाबत फेरविचार शक्य’

नवी दिल्ली : कोव्हिशिल्ड लशीच्या दोन मात्रांतील अंतर सध्या १२ ते १६ आठवडे आहे. त्यापेक्षा कमी कालावधीही उपयुक्त ठरू शकतो, हे शास्त्रीय आधारावर स्पष्ट झाल्यास तसा निर्णय घेण्यात येईल, असे लसीकरणासंदर्भातील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे (एनटीएजीआय) प्रमुख एन. के. अरोरा यांनी सांगितले. मात्र, सध्याचा कालावधी योग्य असल्याचे नव्या संशोधनातूनही स्पष्ट झाल्यास हा निर्णय कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 1:10 am

Web Title: covishield vaccine union health minister harsh vardhan ntagi akp 94
Next Stories
1 भेट दोन महासत्ताधीशांची…
2 ‘कोव्हॅक्सिन’च्या निर्मितीवरून राजकीय वाद
3 ‘कोविशिल्ड’च्या दोन मात्रांमधील अंतराबाबत चर्चा सुरू
Just Now!
X