News Flash

Covishield Vaccine : जगभरात सिरमच्या लसीची सर्वाधिक किंमत भारतात!

देशात मोठ्या प्रमाणावर दिल्या जाणाऱ्या कोविशिल्ड लसीचे दर १ मेपासून बदलणार आहेत.

देशात लसीकरण सुरू झाल्यामुळे करोनाविरोधातल्या लढ्याला मोठं बळ मिळालं आहे. प्रारंभी पुण्यातल्या Serum कडून उत्पादित केली जाणारी Covieshield आणि भारत बायोटेकी Covaxin या दोन लसींनाच देशांतर्गत वापराला मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी आत्तापर्यंत देशात झालेल्या बहुतेक लसीकरणासाठी कोविशिल्डचाच वापर करण्यात आला आहे. मात्र, नुकतीच सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी खुल्या बाजारात खासगी रुग्णालयांसाठी कोविशिल्डचे नवे दर जाहीर केले असून त्यानुसार आता खासगी रुग्णालयांना कोविशिल्ड लसीच्या प्रत्येक डोससाठी ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार ही किंमत जगभरात कोविशिल्ड लस ज्या ज्या देशांमध्ये दिली जात आहे, त्यात सर्वाधिक असणार आहे. येत्या १ मे पासून लसीचे नवे दर लागू करण्यात येणार आहेत.

आत्तापर्यंत होती १५० रुपये प्रतिडोस किंमत!

नुकतीच केंद्र सरकारने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातल्या व्यक्तींना लस घेण्याची परवानगी देत लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर फायझर, मॉडेर्ना, स्पुटनिक व्ही अशा परदेशी लसींना देखील भारतात वितरणाची परवानगी देण्यासाठी पावलं उचलण्यात आली. त्यानंतर सिरम Adar Poonawalla यांनी देखील सिरमच्या कोविशिल्ड लसीचे नवे दर जाहीर केले. आत्तापर्यंत १५० रुपयांमध्ये कोविशिल्ड लसीचा एक डोस सरकारला घ्यावा लागत होता. आता तीच किंमत राज्य सरकारांसाठी ४०० रुपये प्रतिडोस इतकी होणार असून खासगी रुग्णालयांसाठी ती किंमत ६०० रुपये प्रतिडोस असणार आहे.

जगभरातले कोविशिल्ड लसीचे दर!

जगभरात अमेरिका, ब्रिटन, युरोपातील काही देश, बांगलादेश, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका या भागात कोविशिल्ड लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, भारतातील नव्या दरांनुसार लसीचा एक डोस आंतरराष्ट्रीय दरांनुसार ८ डॉलरपर्यंत जाणार आहे. जगात कुठेही कोविशिल्ड लसीच्या डोसची इतकी किंमत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. यापैकी बहुतेक देशांमध्ये लस मोफत दिली जात असून त्याचा खर्च तेथील सरकार उचलत आहे. सध्या युरोपातील देशांमध्ये कोविशिल्डच्या एका डोससाठी २.२५ ते ३.५० डॉलर, ब्राझीलमध्ये ३.१५ डॉलर, ब्रिटनमध्ये ३ डॉलर तर अमेरिकेत ४ डॉलर इतकी किंमत मोजली जात आहे. अमेरिका आणि ब्रिटनकडून थेट AstraZeneca कडून लसीचे डोस घेतले जात आहेत.

Adar Poonawalla : हे असं का? फरहान अख्तरचा थेट अदर पूनावालांना सवाल…!

महाराष्ट्रात काय परिस्थिती?

दरम्यान, भारतात परदेशी लसी विकत घेण्यासाठी अत्यंत महाग असल्याची प्रतिक्रिया दोनच दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. लसीचे डोस अपुरे पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून १८ ते ४४ वयोगटातल्या सधन नागरिकांना लस विकतच घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासोबतच राज्यातील गरीब आणि अतीगरीब जनतेला मोफत लस देण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करत असून लवकरच त्यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल, असं देखील राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 4:24 pm

Web Title: covishild vaccine price in india more than world over adar poonawalla serum pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 भारतातील करोना परिस्थितीवर पाकिस्तानी पंतप्रधानांचं भाष्य; म्हणाले…
2 शुद्ध मनानं राहुल गांधींची केंद्र सरकारकडे विनंती
3 “करोना काळात देशातील शांतता, स्थैर्याऐवजी अमित शाहांनी महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याला प्राधान्य दिलं”
Just Now!
X