जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्य़ात एका विद्यार्थ्यांने चक्क आपल्या गायीच्या नावाने परीक्षेचे प्रवेशपत्र बनवून घेतल्याने खळबळ उडाली आहे.
सरकारी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राज्यात रविवारी प्रवेशपरीक्षा होत होती. ही परीक्षा देण्यासाठी बडगाम जिल्ह्य़ातील चंदुरा भागातील अब्दुल रशीद भट या विद्यार्थ्यांने ऑनलाइन अर्ज भरला. त्यात त्याने आपल्या तांबू गायीच्या नावाने माहिती भरली. गायीच्या वडिलांच्या नावाच्या रकान्यात लाल सांड असे नाव लिहिले आणि आश्चर्य म्हणजे हा अर्ज स्वीकारला जाऊन तांबू गायीच्या नावाने परीक्षेचे प्रवेशपत्र बनलेही. रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी तिला बेमिना येथील सरकारी पदवी महाविद्यालयात हजर राहायचे होते. राज्यातील नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे प्रवक्ते जुनैद आझीम मट्टू यांनी या प्रवेशपत्राचे छायाचित्र आपल्या ट्विटर खात्यावर प्रसिद्ध करून २ मे रोजी या प्रकरणाला तोंड फोडले. त्यानंतर परीक्षेदिवशी केंद्रावर हजर राहिलेली गाय पाहण्यासाठी सामान्य नागरिक आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली. पण गाय आणि तिचा मालक भट हा विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले. dv12याबाबत भटले सांगितले, ‘मला कोणाचीही कुचेष्टा करायची नव्हती, तर केवळ व्यवस्थेतील त्रुटी दाखवून द्यायच्या होत्या. त्यासाठीच मी हा खटाटोप केला.’ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपरीक्षा घेणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष गुलाम हसन तंत्रय यांनी या प्रकरणााची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.