केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने नव्या कृषी कायद्यांच्या मुद्यावर सोमवारी झालेली चर्चेची सातवी फेरीही निष्फळ ठरली. कायदे रद्द न करता दुरुस्ती करण्याचा केंद्राचा प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी फेटाळल्यामुळे तिढा कायम राहिल्याची माहिती समोर येत आहे. एकीकडे चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यावर भर दिला जात असतानाच दुसरीकडे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आक्रामक धोरण अवलंबल्याचं चित्र दिसत आहे. केंद्राने लागू केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी पंजाबमधील होशियारपुरमध्ये काही लोकांनी भाजपा नेत्याच्या घरासमोर शेणाने भरलेली ट्रॉली रिकामी केली. यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना इशारा देत कायदा हातात न घेण्याचं आवाहन केलं आहे. अमरिंदर सिंह यांनी आंदोलनाच्या नावाखाली एकाद्या व्यक्तीचा छळ सहन केला जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय.

शेतकरी आंदोलनाला समर्थन करणाऱ्या काही लोकांनी शुक्रवारी हरयाणामध्ये राहणारे पंजाब सरकारमधील माजी मंत्री तीक्ष्ण सूद यांच्या घरसामोर शेणाने भरलेली संपूर्ण ट्रॉलीच खाली केली. ज्यांनी ही ट्रॉली माजी मंत्र्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर खाली केली ते सर्वजण शेतकरी असल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनासंदर्भात घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेला विरोध करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. या लोकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करतच ही ट्रॉली मंत्र्याच्या घरासमोर खाली केली. यानंतर संतापलेल्या सूद यांनी आपल्या कार्यकर्त्यांसहीत राय बहादुर जोधमल रस्त्यावर धरणे आंदोलन करत घराच्या प्रवेशद्वारावर शेणाची ट्रॉली रिचवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. पंजाबमधील भाजपाचे प्रमुख अश्विनी कुमार यांनाही या प्रकरणासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी अल्याचे सांगत आलेल्या काही लोकांनी सूद यांच्या घरावर हल्ला केला आणि असं कृत्य केलं की ज्या माध्यमातून राज्यातील शांतंता भंग होईल, अशी टीका कुमार यांनी केली.

पंजाबचे मुख्यमंत्रमी अमरिंदर सिंह यांनी या घटनेची दखल घेतली आहे. अशाप्रकारे एखाद्यावर खासगी पद्धतीचा हल्ला केल्याने आंदोलनाचे नाव आणि हेतू दोन्ही खराब होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुकारलेल्या या लढाईमध्ये आंदोलकांनी कायदा हातात घेऊ नये असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांनी संयम बाळगावा असंही आवाहन केलं आहे. अशापद्धतीच्या कृत्याने वेगवेगळ्या जातींमध्ये, धर्मांमध्ये आणि समुदायांमध्ये असणारा सलोखा आणि सद्भभावनेचे वातावरण खराब होईल. अशाप्रकारे राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर कुटुंबियांना त्रास दिल्यास त्याचा परिणाम राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर होईल अशी भीतीही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली.