गायीच्या संरक्षणासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गोहत्या आणि गोतस्करी प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधितांविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच ‘रासुका’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, केवळ गोहत्येप्रकरणी दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार नाही, तर गोतस्करी करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. गोतस्करी प्रकरणातही दोषी आढळल्यास राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. गोहत्या आणि गोतस्करी प्रकरणी दोषी आढळल्यास समाजविघातक कृती प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला जाणार आहे.

दरम्यान, गोहत्या आणि गोतस्करी प्रकरणी दोषी आढळल्यास रासुका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश अखिलेश यादव सरकारच्या काळात जारी करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी या आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती, असे सांगितले जाते. आता उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आहे. तर योगी आदित्यनाथ हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे पोलीस महासंचालक सुलखान सिंह यांनी सरकारच्या आदेशानुसार पुन्हा फर्मान सोडले आहे. केंद्र सरकारने नुकताच आठवडी बाजारात कत्तलीसाठी आणण्यात येणाऱ्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्याबाबत अधिसूचना जारी केल्यानंतर पोलीस महासंचालकांनी हा आदेश जारी केला आहे. सरकारने पशूहत्या रोखण्यासाठी जनावरांच्या खरेदी – विक्रीवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली आहे. मात्र, त्यावर सध्या वाद सुरू आहे. दरम्यान, याआधी योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेच अवैध कत्तलखान्यांवर कारवाई केली होती. राज्यातील सर्व अवैध कत्तलखाने बंद करण्यात आले होते.