शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या पुन्हा एकदा चर्चेत आल्या. त्यानंतर त्यांना भोपाळ येथून उमेदवारी का देण्यात आली यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. आता मात्र त्यांचा आणखी एक दावा चर्चेत आहे. गोमुत्र प्राशन केल्याने माझा ब्रेस्ट कॅन्सर बरा झाला असा दावा साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत केला. मात्र साध्वी प्रज्ञा यांच्यावर २००८, २०१२ आणि २०१७ या तीन वर्षांमध्ये तीन सर्जरीज करण्यात आल्या त्यामुळे त्यांचा कॅन्सर बरा झाला. हा दावा राम मनोहर लोहिया इन्स्टिट्युटच्या सर्जनने केला आहे.

डॉक्टर एस. एस. राजपूत यांनी हा दावा केला आहे. गोमुत्र प्राशन केल्याने कर्करोग बरा झाला असे त्यांना वाटते आहे. मात्र त्यात फारसे काही तथ्य नाही. त्यांच्यावर सर्जरी करण्यात आल्याने त्यांचा कॅन्सर बरा झाला. त्या जे म्हणत आहेत की गोमुत्र प्राशनाने फायदा झाला. याबाबत फायदा झालाच असेल असे ठामपणे मुळीच सांगता येत नाही असेही राजपूत यांनी म्हटले आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या गोमुत्र प्राशनाबाबत तुम्हाला काही ठाऊक आहे का? असे राजपूत यांना विचारले असता, हो त्या कॅन्सर झालेला असताना गोमुत्र प्राशन करत होत्या. त्यांचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांनी हा उपाय प्रज्ञासिंह ठाकूर यांना सांगितला होता. त्या योगा करण्याआधी, गोमुत्र प्राशन करण्याआधी माझा सल्ला घेत असत असंही राजपूत यांनी स्पष्ट केले. मिरर नाऊशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

गोमुत्र प्राशनामुळे शरीराला कोणतंही नुकसान होत नाही. त्यामुळे मी त्यांना त्याची संमती दिली. गोमुत्र प्राशन केल्याने आपला कॅन्सर बरा झाला हा दावा जरी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर करत असल्या तरीही त्यात फारसे काही तथ्य नाही कारण गोमुत्रामुळेच कॅन्सर बरा झाला असे ठामपणे मुळीच सांगता येत नाही. त्यांच्यावर २००८ ते २०१७ या कालावधीत तीन सर्जरी झाल्या त्यामुळे त्यांचा कॅन्सर बरा झाला असे डॉक्टर राजपूत यांनी म्हटले आहे.