कत्तलखान्यासाठी गायी नेत असल्याच्या संशयावरुन गोरक्षकांनी काही जणांना बेदम मारहाण केली होती. त्यापैकी एका जणाचा राजस्थानमधील अलवार येथे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अलवार महामार्गावर गोरक्षकांनी सहा वाहने अडवली होते. त्या वाहनांत काही गायी होत्या. गायी नेणारे सर्व जण मुस्लिम होते. त्यांना त्याच वेळी मारहाण करण्यात आली. एकूण पंधरा जणांना मारहाण करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले. त्या मारहाणीत पेहलू खान या तरुणाचा मृत्यू झाला. अद्यापही काही जण रुग्णालयात उपचार घेत असल्याचे पोलिसांनी म्हटले. हरियाणातील नूह जिल्ह्यातून हे लोक आले होते. राजस्थानमधून गायी घेऊन ते हरियाणामध्ये जात होते. राजस्थानच्या गोवंश हत्या प्रतिबंध कायदा १९९५ नुसार कत्तलीसाठी गोवंशातील जनावरे वाहून नेण्याची परवानगी नाही परंतु शेतीच्या कामासाठी किंवा दुभदुभत्याच्या व्यवसायासाठी तुम्ही ही जनावरे पूर्व परवानगी घेऊन नेऊ शकतात. त्यांच्याजवळ ही परवानगी होती की नाही याबाबत पोलिसांकडे अद्याप माहिती उपलब्ध नाही. अलवार महामार्गावर २०० हून अधिक गोरक्षकांनी वाहनांची तपासणी केली. या वाहनांमध्ये गायी पाहून वाहून नेणाऱ्यांना मारहाण करण्यात आली. याआधी गुजरात सरकारने गोवंश हत्या प्रतिबंध कायद्यामध्ये सुधारणा घडवून आणली. गुजरातमध्ये गोहत्या करणाऱ्यास १० वर्षांची शिक्षा होती. त्यात सुधारणा करुन जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे.