गोरक्षेच्या नावे जमावाकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसते आहे. मध्यप्रदेशात गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून दोन मुस्लिम महिलांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर ‘गोमातेचा विजय असो’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. या महिलांना कथित गोरक्षकांकडून मारहाण सुरू असताना अनेक लोक शांतपणे बघत बसले होते, तर काही लोक व्हिडिओ काढत होते.

हे प्रकरण मध्यप्रदेशातल्या मंदसौरच्या पश्चिम भागातलं आहे. ‘एनडीटीव्ही’नं दिलेल्या बातमीनुसार या मारहाणीनंतरही या दोन महिलांना गोमांस नेत असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली. मारहाण झालेल्या मुस्लिम महिलांकडे गोमांस नाही तर म्हशीचं मांस होतं असं पोलिसांनी सांगितलं, मध्य प्रदेशात गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे म्हशीच्या मांसावर नाही. मात्र या दोन महिलांवर विना परमिट मांस घेऊन जात असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

खेदाची बाब ही की, मारहाण झालेल्या महिलांवर कारवाई झाली आहे मात्र अद्याप या महिलांना मारणाऱ्या एकाही कथित गोरक्षकावर कारवाई झालेली नाही. या वर्षी जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत गोरक्षकांचे एकूण २७ हल्ले झाले आहेत. हे सगळे हल्ले मुस्लिम बांधवांवरच करण्यात आले आहेत.तर मागील ८ वर्षात गोरक्षच्या संबंधातली एकूण ७० प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पदावर बसल्यापासून देशात गोरक्षकांचे हल्ले ९७ टक्क्क्यांपर्यंत वाढले आहेत, असं एका अहवालात समोर आलं आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे त्या राज्यांमध्ये या घटनांचा जोर जास्त आहे असंही दिसून आलं आहे.

देशात आत्तापर्यंत २८ लोकांवर हल्ले करण्यात आले आहेत ज्यापैकी २४ लोक मुस्लिम होते. फक्त एका अफवेच्या जोरावर जमावाकडून आणि कथित गोरक्षकांकडून लोकांवर हल्ला करण्यात येतो. असल्या हल्ल्यांमध्ये आत्तापर्यंत १३६ लोक जखमीही झाले आहेत. मात्र गोरक्षणाच्या नावे हल्ले करणाऱ्या एकाही गोरक्षकाविरोधात कारवाई झालेली नाही. याआधी महाराष्ट्रातल्या नागपूरमध्येही एकाला अशीच मारहाण करण्यात आली होती. मारहाण झालेल्या माणसानंही गोमांस नसल्याचा दावा केला होता. पण त्याच्याकडे गोमांसच होतं असं फॉरेन्सिक चाचणीत समोर आलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शपथविधी सोहळ्याच्या एक दिवस आधीच कथित गोरक्षकांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. असं असलं तरीही या घटनांवर नियंत्रण मिळवलं जात नाहीये, अशा घटनांमध्ये वाढच होताना समोर आलं आहे. गोरक्षेच्या नावाखाली मारहाण करणाऱ्या जमावावर जोवर कारवाई होणार नाही तोवर असल्या घटना वाढतानाच दिसणार आहेत हे उघड आहे.