सीपीईसी प्रकल्पामध्ये चीन करत असलेल्या गुंतवणूकीवरुन अमेरिकेने पाकिस्तानला सावध केले आहे. सीपीईसी प्रकल्पामुळे पाकिस्तानचा फायदा कमी आणि दीर्घकालीन तोटा जास्त असल्याचे अमेरिकेने मत आहे. चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर गेमचेंजर ठरणार असल्याचे दोन्ही आशियाई देशांनी जाहीर केले असले तरी, त्याचा फायदा फक्त चीनला होणार आहे. अमेरिकेकडे त्यापेक्षा विकासाचे चांगले मॉडेल आहे असे दक्षिण आशियासाठी नियुक्त केलेल्या अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्याने म्हटले आहे.

“सीपीईसी प्रकल्प ही काही पाकिस्तानला मदत नाही. हे स्पष्ट आहे किंवा हे स्पष्ट होणे गरजेचे आहे असे दक्षिण आशियासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अमेरिकेच्या राजनैतिक अधिकारी वेल्स म्हणाल्या. अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामध्ये चिनी कंपन्या आपले कामगार आणि साहित्य पाठवत आहेत.

“पाकिस्तानात मोठया प्रमाणावर बेरोजगारी वाढत आहे पण सीपीईसी प्रकल्प प्रामुख्याने चिनी कामगार आणि साहित्यावर अवलंबून आहे” याकडे वेल्स यांनी लक्ष वेधले. “चीनकडून घेतलेले कर्ज चुकवण्यात विलंब झाला तर त्याचा पाकिस्तानच्या आर्थिक विकासावर परिणाम होईल. पंतप्रधान इम्रान खान यांच्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमाला फटका बसेल” असे वेल्स म्हणाल्या.

चीन बरोबर आर्थिक संबंध विकसित करताना त्यात काय धोके आहेत ते वेल्स यांनी आपल्या भाषणातून दाखवून दिले आहेत. अलीकडच्या काळात दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या पाकिस्तानच्या धोरणामुळे अमेरिका आणि पाकिस्तान संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. आज पाकला अमेरिकेपेक्षा चीन जास्त जवळचा वाटतो.