माकप नेते सूर्यकांत मिश्रा यांची घोषणा
पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यास टाटा आणि अन्य कंपन्यांना सिंगुरमध्ये कारखाना उभारण्याची विनंती करण्यात येईल, असे माकपने मंगळवारी स्पष्ट केले.
आम्ही टाटा आणि प्रत्येकाशी चर्चा करू, असे माकपचे राज्य चिटणीस सूर्यकांत मिश्रा यांनी सांगितले. सिंगुरहून छोटय़ा गाडय़ांचा कारखाना गुजरातमध्ये हलविण्यात आला होता, सत्तेवर आल्यास टाटा आणि अन्य कंपन्यांशी त्याबाबत चर्चा करणार का, असा प्रश्न मिश्रा यांना विचारण्यात आला होता. त्या वेळी तृणमूल काँग्रेसने दीर्घकाळ आंदोलन पुकारले होते.
आम्ही ज्या अटी मान्य करू शकत नाही अशा अटी टाटा कंपनीकडून घालण्यात येण्याची शक्यता आहे आणि तसे झाल्यास काही तरी नवा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल याची तयारीही ठेवली आहे, असेही मिश्रा म्हणाले.
टाटाच्या नॅनो कारखान्यासाठी डाव्या पक्षांनी सिंगुरमधील शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही आणि चूक केली का, असे विचारले असता मिश्रा यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आल्याचे सांगितले. जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी अनुकूलता दर्शविली होती, असेही ते म्हणाले.