सीपीआय-माओवादी ही जगातील चौथी सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना असल्याचे अमेरिकेने एका अहवालात जाहीर केले आहे. अमेरिकेकडून धोकादायक दहशतवादी संघटनांचीही यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये इस्लामिक स्टेट (आयएस), तालिबान आणि अल-शबाब या दहशतवादी संघटनांनंतर सीपीआय-माओवादी ही जगातील चौथी सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना आहे.

भारतामध्ये होणाऱ्या ५३ टक्के हल्ल्यात सीपीआय-माओवाद्यांचा हात असल्याचंही या अहवालात म्हटले आहे.  २०१६ आणि २०१७ मध्ये भारतातील माओवाद्यांचे हल्ले कमी झाल्याचंही अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. तर माओवाद्यांच्या हल्ल्यात मरणाऱ्यांच्या संख्येत १६ टक्क्यांनी आणि जखमी होणाऱ्यांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, सलग दुसऱ्या वर्षी भारत दहशतवादाची झळ बसणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. इराक आणि अफगाणिस्थान अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ही आकडेवारी जाहीर केली आहे. २०१५ मध्ये दहशतवादग्रस्त देशांच्या यादीत पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून भारत तिसऱ्या स्थानावर आहे. २०१७ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर दहशतवादी हल्यामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संखेत तब्बल ८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  २०१७ मध्ये भारतात एकूण ८६० दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामधील २५ टक्के दहशतवदी हल्ले एकट्या जम्मू काश्मीरमध्ये झाले आहेत. अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने अहवालात दिली आहे.