पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा वाढता प्रभाव पाहता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि सीपीआय(एम) ला एकत्र निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. परंतु या दोन्ही पक्षांनी त्यांची ऑफर धुडकावून लावल आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा प्रभाव वाढवण्यासाठी ममता बॅनर्जी यांचीच धोरणे जबाबदार असल्याचा आरोप दोन्ही पक्षांकडून करण्यात आला आहे. यापूर्वी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि सीपीएमसारख्या पक्षांनी आपली साथ द्यावी. तसेच भाजपाला रोखण्यास मदत करावी, असे म्हटले होते.

भाजपासोबत आम्हाला कशाप्रकारे संघर्ष करायचा आहे, हे ममता बॅनर्जी यांच्याकडून शिकण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे वरिष्ठ नेते अब्दुल मन्नान यांनी दिली. पश्चिम बंगालमधील सरकारच्या धोरणांमुळेच भाजपाचा राज्यातील प्रभाव वाढवला आहे. आपल्या चुकीच्या धोरणांमुळेच राज्यात भाजपा मजबूत होत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्वीकार करावे, अशीही टीका त्यांनी यावेळी केली. याव्यतिरिक्त सीपीआय(एम)चे सुजान चक्रवर्ती यांनीदेखील राज्यात भाजपाच्या वाढत्या प्रभावासाठी ममता बॅनर्जीच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनीदेखील यावर प्रतिक्रिया देत ममता बॅनर्जींनी केलेल्या आवाहनातून त्यांची भीती दिसून येत असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी डावे, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने एकत्र आले पाहिजे. भाजपा देशाचे संविधान बदलून टाकेल. त्यामुळे सर्वांनी भाजपाविरोधात एकत्र आले पाहिजे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.