भाजपाविरोधी आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे देण्यावर सर्वच प्रादेशिक पक्षांमध्ये एकमत नसून काही पक्षांना त्यावर आक्षेप आहे. काँग्रेसने पुन्हा संयुक्त पुरोगामी आघाडीचा प्रयोग केल्यास यशस्वी होणार नाही. काँग्रेसने आपली विश्वासहर्ता गमावली आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये भाजपाविरोधी मतांची एकजूट झाली पाहिजे असे सीपीआय(एम)चे नियतकालिक ‘पीपल्स डेमोक्रसी’च्या लेखात म्हटले आहे.

भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेस किंवा अन्य कुठल्याही प्रादेशिक पक्षाबरोबर निवडणूकपूर्व आघाडी करण्याची शक्यता सीपीआय(एम)ने फेटाळून लावली आहे तसा राजकीय ठरावच त्यांनी केला आहे. बीजेडी, टीआरएस आणि टीडीपी हे पक्ष काँग्रेसबरोबर आघाडी करणार नाहीत असे सीपीआय(एम) ने म्हटले आहे.

मागच्याच आठवडयात काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजपाविरोधी आघाडी स्थापन करण्यासंदर्भात डिनरच्या निमित्ताने २० पक्षांचे नेते एकत्र आले होते. त्यात सीपीआय(एम) चे सुद्धा नेते होते.

उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बसपा एकत्र आले. त्याचा त्यांना फायदा झाला. सध्याच्या घडीला भाजपाला रोखण्यासाठी अशा रणनितीची गरज आहे. भाजपाचा पराभव कसा करता येऊ शकतो हे उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीने दाखवून दिले आहे. उत्तर प्रदेशात भाजपाच्या जागा घटल्या तर लोकसभेत ते बहुमत मिळवू शकणार नाहीत असे या लेखात म्हटले आहे.