‘मूडीज’ या आंतरराष्ट्रीय वित्त संस्थेकडून भारतीय अर्थव्यवस्थेच्या पतमानांकनात वाढ करण्यात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांच्या कामगिरीबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यापूर्वी जागतिक बँकेच्या अहवालानंतरही अशाचप्रकारचे राजकीय युद्ध रंगले होते. या सगळ्याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटत आहेत. परंतु, या सगळ्या घटनाक्रमात एक रंजक गोष्ट समोर आली आहे. विरोधकांकडून सोशल मीडियावर करण्यात येत असलेल्या या टीकेचा फटका ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांना बसला आहे. ही गोष्ट ऐकायला विचित्र वाटेल पण ‘मूडीज’शी असलेल्या नामसार्धम्यामुळे टॉम यांना विनाकारण टीकेचा सामना करावा लागत आहे.

मूडिज रेटिंगमुळे अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’ हा तर भ्रम- मनमोहन सिंग

मूडिज या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकन संस्थेने १३ वर्षांनी भारताच्या मानांकनात वाढ केली आहे. मात्र, मूडीजच्या मानांकनात भारत येणे म्हणजे इथली अर्थव्यवस्था सुधारली असे नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे. यावरून मूडीजला लक्ष्य करायला गेलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) सायबर सेलने एक मोठा घोळ घातला. त्यांनी फेसबूकवर ‘मूडीज’च्या ऐवजी टॉम मुडी यांना लक्ष्य केले. त्यामुळे सध्या टॉम मुडी यांच्या फेसबुक पेजवर ‘तुम्ही अनुकूल अहवाल देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कमिशन घेतली’, ‘ २०१९ मध्ये तुमच्या मोदींना पराभवाची धूळ चाखायला लावू’, अशा टीकात्मक संदेशांचा पाऊस पडत आहे. अखेर एका युजरने याबद्दल खुलासा केला. प्रिय कॉम्रेडस्, कृपया चांगली भाषा वापरा, टॉम मुडी हे निष्पाप आहेत आणि त्यांनी कधीच मोदी सरकारचे कौतुक केलेले नाही. लाल सलाम, असे सांगत त्याने कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना चूक लक्षात आणून दिली. बऱ्याचशा कमेंट्स या मल्ल्याळम आणि इंग्रजी भाषेत होत्या. अखेर काही वेळाने कार्यकर्त्यांना आपली चूक उमगली आणि त्यांनी टॉम मूडी यांची माफीही मागितली.

‘विरोधकांना आत्मचिंतनाची गरज;’ मूडीजच्या अहवालानंतर जेटलींचा टोला