प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील व्यापाराचा दहशतवाद्यांच्या साह्य़ासाठी दुरूपयोग होत असल्याचे उघड

एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली

पाकिस्तानातील व्यापारसंस्थांचे दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याचे स्पष्ट करीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) बारामुल्ला पूंछमार्गे पाकिस्तानकडून होणारा व्यापार भारताने गुरुवारी तत्काळ स्थगित केला.

पाकिस्तानला देण्यात आलेला विशेष अग्रक्रमाचा दर्जा पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने तडकाफडकी रद्द केला होता. त्यानंतर दोन महिन्यांत पाकिस्तानला हा दुसरा धक्का आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि गुप्तचर विभाग (आयबी) यांच्याकडून आलेल्या गोपनीय अहवालांच्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकारी गोटातून सांगण्यात आले. विशेष अग्रक्रमाचा दर्जा रद्द केल्यानंतर मोठे करांचे ओझे टाळण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेमार्गे होणाऱ्या व्यापाराला पाकिस्तानने अधिक चालना दिली होती.

बारामुल्ला जिल्ह्य़ातील उरीतील सलामाबाद आणि पूँछ जिल्ह्य़ातील चाकन दा बाग या दोन ठिकाणी या व्यापारासाठी दोन विशेष केंद्रे आहेत. मात्र या मार्गाने पाकिस्तानकडून देशातील फुटीर गटांसाठी बेकायदा शस्त्रास्त्रे, अंमली पदार्थ, हवालाची रक्कम आणि बोगस चलन भारतात येत असल्याचे गुप्तचर विभागाने कळवताच हा निर्णय घेतला गेला.

पाकिस्तानच्या बाजूने या व्यापारावर नियंत्रण असणाऱ्या अनेकांचे बंदी घातलेल्या दहशतवादी गटांशी संबंध आहेत. इतकेच नव्हे, तर भारतातून दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी जे काहीजण पाकिस्तानात गेले त्यांनी तेथे व्यापारसंस्था काढल्याचीही माहिती आहे. या संस्थांवरही अतिरेकी गटांचेच वर्चस्व आहे.

या व्यापाराच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देणारे भारताचे पाकिस्तानातील तत्कालीन राजदूत जी. पार्थसारथी यांनी सांगितले की, ‘‘सीमांची बंधने व्यापार आणि पर्यटनाच्या आड येऊ नयेत, यासाठी तेव्हा हा निर्णय घेतला गेला होता. पण दहशतवादाच्या पाश्र्वभूमीवर सरकारने आता घेतलेला निर्णय योग्यच आहे. जेव्हा दहशतवाद संपुष्टात येईल तेव्हाच सीमा मनातून पुसल्या जातील.’’

‘एलओसी’ व्यापार..

* उभय देशांनी परस्परविश्वास वृद्धीचा उपाय म्हणून हा व्यापार २००८मध्ये सुरू केला.

* दर आठवडय़ाला मंगळवार ते शुक्रवार असे चार दिवस हा व्यापार वस्तुविनिमय पद्धतीने उभय देशांतील काश्मीरमधून होतो.

* यात लाल मिरची, चिंच, जिरे, केळी, आंबे, खजूर आणि सुका मेवा आदी २१ उत्पादनांचे आदान-प्रदान होते.

* त्यातून चाकन दा बाग येथून १ हजार ८२ कोटींचा तर सलामाबाद येथून १,६९८ कोटींचा याप्रमाणे दोन्ही मिळून २,७८० कोटी रुपयांचा व्यापार होतो.

* २००८मध्ये ६०० व्यापाऱ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. सध्या त्यांची संख्या २५०वर आली होती.

आधी नकारघंटा

याआधी २०१५-१६मध्येही राष्ट्रीय तपास यंत्रणेने हा व्यापार बंद करण्याची शिफारस केली होती. मात्र राज्यातील भाजप-पीडीपी सरकारने तिला विरोध केला होता.