काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील चकमकीत झालेल्या दोन नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी सैन्यातील जवानांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. यावरून काश्मीर सरकारमध्ये भागीदार असणाऱ्या भाजपा आणि पीडीपीत फूट पडली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी शोपियान जिल्हयात गनोवपुरा गावातून जाणाऱ्या जवानांच्या ताफ्यावर नागरिकांनी तुफान दगडफेक केली. शेकडोंच्या संख्येने चालून आलेल्या जमावाला हटवण्यासाठी जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडल्या. यावेळी जवान व नागरिक यांच्यात झालेल्या संघर्षात दोन जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले होते. याप्रकरणी एक मेजर दर्जाचा अधिकारी आणि जवानावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, भाजपा आमदार आर.एस. पठानिया यांनी हा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. माझी वैयक्तिक भूमिका हीच पक्षाचीही भूमिका आहे. एखाद्या व्यक्तीचा अशाप्रकारे मृत्यू होणे, ही नक्कीच निषेधार्ह बाब आहे. मात्र, याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी होऊन नंतरच गुन्हेगारी कारवाई करणे योग्य ठरेल. या मुद्द्यावर एकमत असणे गरजेचे आहे, असे त्यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान सांगितले.

तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्याच दिवशी फासावर का चढवू पाहत आहात, ही गोष्ट मला कळत नाही, असे पठानिया यांनी म्हटले. तसेच भारतीय सुरक्षादलांनी गरज नसतानाही गोळीबार केला, या विरोधकांच्या वक्तव्यावरही त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. जर सैन्याने खरंच तसं केलं असेल तर त्यांच्यावर दबाव आणायलाच पाहिजे आणि सरकारनेही याची गंभीर दखल घेतली पाहिजे. मात्र, आरोप झाल्यानंतर सैन्याच्या जवानांवर पहिल्याच दिवशी गुन्हा दाखल करण्याची गरज आहे का, असा सवाल त्यांनी विचारला.

भारतीय सैन्याच्या दाव्यानुसार ताफ्यातील एका अधिकाऱ्याच्या हातातील बंदूक हिसकावून त्याला बेदम मारहाण करण्याचा प्रयत्न जमावाने केल्यानेच जवानांना गोळीबार करावा लागला. गनोवपुरा गावातून जवानांचा ताफा जात होता. त्याचवेळी अचानक १००-१२० नागरिकांनी जवानांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात झाली. जवान त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत होते. पण जमाव काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. बघता बघता जमावाचा आकडा २५० वर गेला आणि त्यांनी जवानांवर दगडफेक करणे सुरूच ठेवले. यामुळे जमावाला पांगवण्यासाठी जवानांनी हवेत गोळीबार केला. पण त्यानंतर जमाव अधिकच आक्रमक झाला. त्यांनी जवानांच्या ४ वाहनांवर हल्ला करत ती पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे उभे असलेल्या एका अधिकाऱ्यावरही जमावाने हल्ला केला. त्याच्या हातातील बंदूक खेचून त्याला लाथाबुक्क्यांनी मारण्यास जमावाने सुरुवात केली. यामुळे जवानांना गोळीबार करावा लागला. यात २ नागरिक ठार झाल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली होती.