08 March 2021

News Flash

मंदीत ‘ॲमेझॉन’ देणार नोकरीची संधी; भारतात ५०,००० लोकांना मिळणार रोजगार

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विशेष सुविधाही कंपनीकडून पुरवल्या जाणार

ॲमेझॉन

करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांसमोर बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होत असतानाच भारतातील आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असणाऱ्या ॲमेझॉनने देशात ५० हजार नोकऱ्यांची संधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये घरपोच डिलेव्हरीची मागणी वाढल्याने कंपनीने कंत्राटी कामगारांची आवश्यकता असल्याचे म्हटलं आहे. ऑनलाइन माध्यमातून मोठ्याप्रमाणात खरेदी होत असून या गोष्टींची डिलेव्हरी करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाणार असल्याचे कंपनीने शुक्रवारी (२२ मे २०२०) स्पष्ट केलं. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

मागणी आणि पुरवठा साखळीमधील वेगवेगळ्या स्तरामधील नोकऱ्या उपलब्ध असल्याचे ॲमेझॉनने स्पष्ट केलं आहे. या ५० हजार नोकऱ्यांमध्ये अगदी फुलफीलमेंट सेंटर्स म्हणजेच वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी शहरामध्ये उभारण्यात आलेल्या केंद्रांमधील नोकऱ्यांपासून ते डिलेव्हरी करण्यापर्यंत अनेक नोकऱ्यांचा समावेश आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये म्हणजेच २५ मार्चपासून १७ मेपर्यंत देशामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना वस्तुंची डिलेव्हरी करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा आणि किरणामालाच्या वस्तू वगळता इतर वस्तूंच्या डिलेव्हरीवर घालण्यात आलेली बंदी केंद्र सरकारने नुकतीच उठवली आहे. देशभरामध्ये अत्यावश्यक वस्तूंबरोबरच इतर वस्तूंची डिलेव्हरी करण्याची परवानगीही ई-कॉमर्स कंपन्यांना देण्यात आली आहे. त्यानंतर ई-कॉमर्स साईटवरुन वस्तूंच्या ऑर्डरची संख्या वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

भारत सरकारने ग्रीनबरोबर ऑरेंज आणि रेड झोनमध्येही डिलेव्हरी देण्याची परवानगी ई-कॉमर्स कंपन्यांना दिली आहे. केवळ कंटेंटमेंट झोनमध्ये डिलेव्हरी करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. ॲमेझॉनच्या कस्टमर फुलफीलमेंट सेंटर ऑप्रेशन्स विभागाचे उपाध्यक्ष असलेल्या अखिल सक्सेना यांनी, “कंपनीने फुलफीलमेंट सेंटर आणि डिलेव्हरीसंदर्भातील कामांसाठी ५० हजार नोकऱ्यांची भरती काढली आहे. हे सर्व कामगार कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहेत. या माध्यमातून लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. कंपनीकडून चांगल्या पद्धतीचे वर्तवणूक दिली जाईल,” असं स्पष्ट केलं आहे. स्थलांतरित मजुरांनी लॉकडाउननंतर आपल्या राज्यात जाण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका ई-कॉमर्स कंपन्यांच्या पुरवठा साखळीला बसला आहे. त्यामुळेच पुरवठ्यासंदर्भातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांमध्येच स्पर्धा सुरु झाली आहे.

आपल्या कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कंपनीने उपाययोजना केल्याचे ॲमेझॉनने स्पष्ट केलं आहे. प्रत्यक्ष ग्राहकांच्या घरी जाऊन डिलेव्हरी देणाऱ्यांपासून ते वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी आम्ही घेतली असून त्याबद्दल उपाययोजना केल्या आहेत. आजारी असल्यास त्या दिवशी कामावर यायला जमलं नाही तरी पगार देणे, आजारपणाच्या सुट्ट्या म्हणजेच सिक लिव्ह वाढवणे तसेच कामावर आल्यानंतर शरिराचे तापमान तपासून पाहणे यासारख्या गोष्टी कंपनीच्या माध्यमातून केल्या जात असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.

भारतामधील अनेक ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात कपात केलेली असतानाच आता ॲमेझॉनने नव्याने कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ॲपच्या माध्यमातून सेवा पुरवणाऱ्या ओलाने १४०० जणांना तर फूड डिलेव्हरी ॲप असणाऱ्या झोमॅटोने ५०० आणि स्वीगीने ११०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 5:41 pm

Web Title: creating close to 50000 seasonal jobs says amazon india scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Lockdown: पुण्याहून परभणीकडं पायी निघालेल्या ऊसतोड मजुराचा अन्न पाण्याविना मृत्यू
2 ते तीन शब्द अन्… द्रविड-लक्ष्मणने खेळून काढला अख्खा दिवस
3 लॉकडाउनमुळे अभिनेत्री झाली बेरोजगार; महिन्याच्या खर्चासाठी मेकअप मॅनने केली मदत
Just Now!
X