जास्त राज्यांच्या निर्मितीमुळे देशाची एकात्मता धोक्यात येईल आणि विविधतेलाही धक्का पोहोचेल, अशा इशारा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एन. संतोष हेगडे यांनी मंगळवारी दिला. वेगळ्या तेलंगणा निर्मितीला यूपीए आणि कॉंग्रेसने गेल्या आठवड्यात हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांच्या मागण्या पुढे येऊ लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हेगडे यांनी हा इशारा दिला.
टीम अण्णाचे सदस्य असलेले हेगडे म्हणाले, वेगळ्या तेलंगणामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागातून वेगळ्या राज्यांची निर्मिती पुढे आलीये. वेगळ्या विदर्भाची आणि बोडोलॅंडची मागणीही केली जाऊ लागलीये. उत्तर प्रदेशची चार राज्यांत विभागणी करण्याची मागणी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केलीये. वेगळ्या तेलंगणामुळे उद्या कर्नाटकातून बॉम्बे-कर्नाटक आणि हैदराबाद-कर्नाटक अशा वेगळ्या राज्यांची मागणी निर्माण झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही.
पुढील काळात आणखी वेगळ्या राज्यांची निर्मिती करण्याचा विचार आपण थांबवायला पाहिजे. ते आपल्या देशाच्या हिताचे नाही, असेही हेगडे यांनी स्पष्ट केले.