जर तुमचे क्रेडिट कार्ड हरवले, तर तुम्ही काय कराल, बँकेला त्याविषयी कळवून ते बंद करायला सांगाल पण आता लवकरच तुम्ही एक संदेश पाठवून तुम्ही हरवलेले क्रेडिट कार्ड वितळवून टाकू शकणार आहात. आयोवा स्टेट विद्यापीठातील संशोधकांनी असे पदार्थ शोधून काढले आहेत, की जे इलेक्ट्रॉनिक संदेश म्हणजे ट्रिगर मिळताच नष्ट होतील.
आयोवा स्टेट युनिव्हर्सिटीच्या मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या सहायक प्राध्यापक रेझा मोंटाझामी यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले असून त्यात अस्थायी पदार्थाचे तंत्रज्ञान वापरले आहे. या शाखेला ट्रान्झिएंट इलेक्ट्रॉनिक्स असेही म्हणतात. हे संदेश पाठवताच नष्ट होणारे पदार्थ म्हणजे काही बहुलके म्हणजे पॉलिमर्स असून ते ट्रिगर म्हणजे इलेक्ट्रानिक संदेश मिळताच वितळून जातात. मानवी शरीरात जाऊन वितळणारे पदार्थही त्यामुळे तयार करणे शक्य आहे. लष्करी क्षेत्रात माहिती गोळा करून पाठवणारे व नंतर वितळवून टाकणे शक्य असलेली यंत्रे तायर करता येतील. त्यामुळे गुप्तचर माहितीच्या प्रकल्पाचा मागमूसही कुणाला लागणार नाही.  
मोंटाझामी यांच्या मते इलेक्ट्रॉनिक्सची ही नवीन शाखा असून त्यात अनेक शक्यता प्रत्यक्षात आणता येतील. तुमचा सेलफोनही हरवला तर एक संदेश पाठवून वितळवता येईल. मोंटाझामी यांच्या संशोधन पथकाने विघटनशील बहुलके तयार केली असून त्यांचा वापर इलेक्ट्रॉनिक कम्पोनंटमध्ये करता येईल. माहिती पाठवणारा विघटनशील अँटेना त्यांनी तयार केला आहे. अ‍ॅडव्हान्सड फंक्शनल मटेरियल्स या नियतकालिकात याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. मोंटाझामी यांच्या मते पाणी व अल्कली वायरवर टाकल्यानंतर वायर वितळते व एलइडी म्हणजे लाइट एमिटिंग डायोड नष्ट होते. नष्ट होणारे रेझिस्टर (रोधक) व कॅपॅसिटर (संग्राहक) त्यांनी तयार केले आहेत. अन्न ताजे की शिळे हे ठरवण्यासाठी अन्नपदार्थात संवेदक लावता येतील.  जेव्हा या संवेदकांचे विघटन होईल व ते संदेश पाठवणे बंद होईल, तेव्हा ते अन्न शिळे समजावे. जेव्हा सैनिक जखमी होतात, तेव्हा त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक यंत्रे माहिती घेऊन वितळवून टाकता येतील असे मोंटाझामी यांचे म्हणणे आहे.