२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यामध्ये न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात केली. रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी अखेरच्या फळीमध्ये शतकी भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. मोक्याच्या क्षणी धोनी धावचीत झाला आणि भारताच्या विजयाच्या आशांवर पाणी फिरलं.

उपांत्य सामन्यात धोनी बाद झाल्याचा धक्का त्याच्या चाहत्यांनाही बसला. कोलकात्यामधील एका सायकल दुकानाच्या मालकाने धोनी बाद झाल्यानंतर धक्का सहन झाल्यामुळे आपले प्राण गमावले आहेत. श्रीकांत मैती असं या सायकल दुकानाच्या मालकाचं नाव असून तो ३३ वर्षाचा होता. श्रीकांत आपल्या मोबाईल फोनवर भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पाहत होता.

धोनी बाद झाल्यानंतर श्रीकांत जमिनीवर कोसळला. हा आवाज ऐकून शेजारच्या दुकानातील लोकांनी त्याला लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरु करण्याच्या आधीच श्रीकांतने आपले प्राण गमावले होते.