क्रिकेटच्या मैदानात आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना चकवा देण्यासाठी मैदानात उतरणारा भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार आता राजकीय मैदानात दिसणार आहे. प्रविण कुमारने रविवारी उत्तरप्रेदशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश घेतला. उत्तरप्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवीण कुमारच्या लोकप्रियता समाजवादी पक्षाला फायदेशीर ठरु शकतो. उत्तरप्रदेशमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षात जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचे दिसून येते. यापूर्वी बॉलीवूडची आघाडीची नायिका विद्या बालन हिला अखिलेश सरकारने समाजवादी पेंशन योजनेची सदिच्छादूत बनविले होते. त्यामुळे विद्या बालनची निवड सरकारच्या योजनेच्या प्रसारासाठी करण्यात आलेली निवड आणि प्रवीण कुमारचा पक्षातील प्रवेश या दोन घटना समाजवादी पक्ष आपल्या ताफ्यात लोकप्रिय व्यक्तींना स्थान देऊन जनतेमध्ये लोकप्रियता निर्माण करण्याच्या प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.

प्रवीण कुमारने ६ कसोटी आणि ६८ एकदिवशीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने कसोटी सामन्यात २७ तर एकदिवसीय सामन्यात ७७ बळी मिळविले आहेत. इंडियन प्रिमियर लीगच्या टी-२० सामन्यात प्रवीण कुमारने रॉयल चॅलेंजर बंगळुरू, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, हैद्राबाद सनरायझर्स या संघातून खेळताना दिसला होता. प्रवीण कुमार सध्या आयपीएलमधील गुजरात लायन्स संघाचा सदस्य आहे. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिन, किर्ती आझाद, आणि मोहम्मद कैफ हे क्रिकेटपटू राजकीय मैदानात दिसले होते.