संगीत नाटक अकादमीच्या माजी अध्यक्षा व भरतनाटय़म नर्तिका लीला सॅमसन यांनी चेन्नई येथील कलाक्षेत्र फाउंडेशनच्या  कुथाबालम प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणावर ७.०२ कोटींचा वायफळ खर्च केल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण खात्याने (सीबीआय) त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सॅमसन या पद्मश्रीच्या मानकरी असून त्या केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षही आहेत. त्यांच्या शिवाय फाउंडेशनचे मुख्य लेखा अधिकारी टी. एस. मूर्ती, लेखा अधिकारी एस. रामचंद्रन, अभियंता अधिकारी व्ही. श्रीनिवासन यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी सीबीआयकडे दाखल केलेल्या तक्रारीत असा आरोप केला होता, की फाउंडेशनने नूतनीकरणाच्या कामासाठी ‘कार्ड’ या स्थापत्य संस्थेला कंत्राट दिले होते, त्यात सर्वसाधारण वित्त नियमांचे उल्लंघन झाले.  २०१६ मध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने याबाबत चौकशी केली होती. या फाउंडेशनने नूतनीकरणाच्या कामासाठी ७.०२ कोटी खर्चाचा अंदाज असताना ६२.२० लाख रुपये जादा खर्च केले. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेल्या अंदाजातून हे उघड झाले.

सॅमसन या फाउंडेशनच्या ६ मे २००५ ते ३० एप्रिल २०१२ दरम्यान संचालक होत्या. नूतनीकरणासाठी खुली निविदा प्रक्रिया न अवलंबल्याने यात फाउंडेशनचा मोठा तोटा झाल्याचा आरोप आहे.