कट्टरतावाद्यांच्या धमकीमुळे तीन काश्मिरी विद्यार्थिनींना आपला बॅण्ड (वाद्यवृंद) बंद करावा लागण्याच्या घटनेचे पडसाद देशभरात उमटल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे. या मुलींना फेसबुकवरून धमकावणाऱ्या अनेकांविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. यातील सहा जणांची ओळख पटली असून त्यांच्यासह अन्य काहींना येत्या दोन दिवसांत अटक करण्यात येईल, अशी माहिती राजबाग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. हुरियत कॉन्फरन्सनेही या मुलींची बाजू घेतली आहे. परंतु या मुलींना कोणीही धमकावले नसून प्रसारमाध्यमांमुळेच हे प्रकरण अधिक चिघळले, असा जावईशोध त्यांनी लावला.
आम्ही निर्माण केलेल्या बॅण्डमधील गायन-वादनावर आमचे धर्मगुरू नाखूश होते, याची आम्हाला कल्पना नव्हती. बॅण्ड बंद करण्याच्या त्यांच्या फतव्याचा आम्ही आदरच करतो, अशी प्रतिक्रिया काश्मीरमध्ये बॅण्ड स्थापन करून मौलवींचा रोष पत्करणाऱ्या मुलींपैकी एकीने मंगळवारी प्रथमच दिली.
दहावीत शिकणाऱ्या नोमा नझीर, फराह दीबा आणि अनिका खलिद या तिघा मुलींपैकी एकीने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ही प्रतिक्रिया दिली. आमच्या या निर्णयानंतर काश्मीरमधील उर्वरित बॅण्डही स्वेच्छेने बंद करण्यात आले आहेत, असे या मुलीने सांगितले. दरम्यान, या तीन मुलींपैकी एकीला तिच्या पालकांनी सुरक्षेच्या कारणास्तव बंगलोरला धाडल्याचे समजते.
ही मुलगी खूपच तणावाखाली असल्याने तिच्या पालकांनी हा निर्णय घेतला, मात्र तिचा ठावठिकाणा सांगण्यास त्यांनी नकार दिला.