नवी दिल्ली : २०२० साली देशात ५००३५ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. आदल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण ११.८ टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय, ‘समाजमाध्यमांवरील खोट्या बातम्यांच्या’ ५७८ घटनांचीही या वर्षात नोंद झाली, असे नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीत म्हटले आहे.

२०१९ साली ३.३ टक्के इतका असलेला सायबर गुन्ह्यांचा दर (प्रति एक लाख लोकसंख्येमागे घडलेल्या घटना) २०२० साली ३.७ टक्क्यांपर्यंत वाढला, असेही यात नमूद केले आहे. २०१९ साली देशात सायबर गुन्ह्यांची ४४,७३५ प्रकरणे नोंदली गेली. २०१८ साली हा आकडा २७,२४८ इतका होता.

या गुन्ह्यांमध्ये ऑनलाइन बँकिंग घोटाळ्याची ४०४७ प्रकरणे, ओटीपी घोटाळ्याची १०९३ प्रकरणे व क्रेडिट/ डेबिट कार्ड घोटाळ्याची ११९४ प्रकरणे होती, तर एटीएमशी संबंधित २१६० प्रकरणे २०२० साल नोंदण्यात आली.