देशात न्याय मिळण्यास उशीर होतो आहे त्यामुळे देशात अन्याय वाढतोय, गुन्हेगारी वाढते आहे असे मत निर्भयाची आई आशा देवी यांनी  व्यक्त केले आहे. निर्भयावर २०१२ मध्ये सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर तिला जबरदस्त मारहाण करण्यात आली. निर्भयाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आता निर्भयाच्या आईने न्याय मिळण्यास विलंब होत असल्याने अन्याय वाढत चालल्याचे मत व्यक्त केले आहे.

सध्याच्या घडीला देशात मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. कोवळ्या मुलींवर अत्याचार केले जात आहेत. मात्र या प्रकरणांमध्येही गुन्हेगारांना, नराधमांना जलदगतीने शिक्षा दिली जात नाही. पीडित मुलींना न्यायासाठी वाट बघावी लागते आहे हे दुर्देवी आहे असेही निर्भयाच्या आईने म्हटले आहे.

दिल्लीच्या महिला आयोगाने मुलींवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांबाबत आवाज उठवला आहे. एवढेच नाही तर निर्भया प्रकरणात आरोपींना दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी होण्यासाठी तिहार तुरुंग प्रशासनाला नोटीसही बजावली आहे. त्यानंतर निर्भयाच्या आईची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. महिला आयोगाने मला खूप चांगल्या प्रकारे पाठिंबा दिला असेही निर्भयाच्या आईने म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. निर्भया प्रकरणातही न्याय मिळण्यास उशीरच झाला असेही तिच्या आईने म्हटले आहे. निर्भया प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास आणखी किती विलंब लागणार आहे ते आपल्यालाही ठाऊक नाही असेही निर्भयाच्या आईने म्हटले आहे.

 

काय आहे निर्भया प्रकरण?
दिल्लीत चालत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला. बलात्कारानंतर नराधमांनी केलेले कृत्य अत्यंत भयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारे होते. तिला उपचारांसाठी दिल्लीत ठेवण्यात आले होते. तसेच तिला देशाबाहेर नेऊनही तिच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र ती वाचली नाही. या प्रकरणात एकूण ६ जण दोषी होती. ज्यापैकी एकजण अल्पवयीन होता. तर एक दोषी राम सिंह याने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. यानंतर ४ दोषींना दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाविरोधात दोषींच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टानेही ही याचिका फेटाळून लावत या चारही नराधमांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.